Maharashtra D. Ed Course: बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर 'डीएड'चा (Diploma in Education) कोर्स करून अनेकजण प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. आता, राज्यातील डीए़ड कॉलेज बंद होणार असल्याची चर्चा आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता डीएड कालबाह्य होणार असून शिक्षक होण्यासाठी इंटिग्रेटेड बी एड डिग्री कोर्स असणार आहे. या निर्णयाचा मोठा परिणाम राज्याच्या शैक्षणिक वर्तुळावर होणार आहे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात शिक्षक प्रशिक्षणाचे टप्पे बदलणार आहेत. याची राज्यात लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक धोरणानुसार डीएड अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी चार वर्षाचा इंटिग्रेटेड बीएड डिग्री कोर्स असणार आहे.
नव्या शैक्षणिक धोरणांनुसार कसा असणार अभ्यासक्रम?
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षाचा हा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येणार आहे. तीन वर्षाची बॅचलर डिग्री पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला दोन वर्षाचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येईल. तर चार वर्षाची डिग्री पूर्ण झालेल्या किंवा पदव्युत्तर (मास्टर)अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला एक वर्षाचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स शिक्षक होण्यासाठी करता येणार आहे.
अध्यापन शास्त्रातील नव्या तंत्रज्ञानाचा त्यासोबतच नव्या गोष्टींचा या इंटिग्रेटेड कोर्समध्ये समावेश केलेला आहे, त्यासोबतच या अभ्यासक्रमामध्ये व्यवहारिक प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कधीपासून सुरू होणार नवा अभ्यासक्रम?
नवे शिक्षक प्रशिक्षण टप्पे कधी सुरू होणार ? या संदर्भात शिक्षण विभागाकडून अधिकृतरित्या जाहीर केले गेले नाही. येत्या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. डीएड कोर्स मोडीत निघणार असल्याने या पदविकाधारकांचा प्रश्न सरकारला सोडवावा लागणार आहे.
डीएड महाविद्यालयांची स्थिती बिकट
कधीकाळी डीएडच्या कोर्सने सुवर्णकाळ पाहिला आहे. डीएडच्या अभ्यासक्रमाने हजारो विद्यार्थ्यांना भुरळ पाडली होती. त्यामुळे बारावी झाल्यानंतर डीएडचा कोर्स आणि नंतर नोकरी असा कल विद्यार्थ्यांमध्ये दिसू लागला होता. त्यानंतर डीए़डच्या अभ्यासक्रमाला असलेली मागणी लक्षात घेता, अनेक डीएड महाविद्यालये सुरू झाली. यामध्ये खासगी, विनाअनुदान तत्वावरील महाविद्यालयांची संख्याही अधिक आहे. मात्र, मागील काही वर्षात शिक्षक भरती प्रक्रिया जवळपास नसणे, टीईटी परीक्षा, अभियोग्यता चाचणी आदी कारणांमुळे डीएडच्या अभ्यासक्रमाला असलेली मागणी कमी होत चालली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांअभावी राज्यातील अनेक महाविद्यालये ओस पडू लागली आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI