Edible Oil Prices Latest News: महागाईचे चटके सोसणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खाद्य तेलाच्या किमतीत जवळपास 22 ते 25 टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोनानंतर जवळपास दोन ते अडीच वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्य तेलाची मागणी आणि दर कमी झाल्याने देशात खाद्यतेलाचे दर कमी झाल्याचा पाहायला मिळतंय. आता त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एकीकडे सर्वच गोष्टी महाग होत असताना आणि महागाई वाढत असताना त्यात काहीसा दिलासा सर्वसामान्यांना खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये मिळला आहे. खाद्य तेलाच्या किमतीत आज जवळपास 22 ते 25 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून या किंमतीमधील घसरण पाहायला मिळत असून होळीपासून अधिकची घसरण पाहायला मिळाली आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या हंगामात मोहरीचे तेल 165 ते 170 रुपये लिटर या किमतीत विकले जात होते, आता ही किंमत कमी होऊन 135 ते 140 रूपये प्रति लिटरवर आली आहे. मोहरीने गेल्या वर्षीचाच ट्रेंड कायम ठेवल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील एका महिन्यात मोहरीचे तेल 10 टक्के, सोयाबीन तेल 3 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. मागणी घटल्याने सोयाबीन खाद्य तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. रिफाइंड सोयाबीन तेलाचा भाव 140-145 रुपयांवरून 115-120 रुपये प्रति लिटर आणि सूर्यफूल तेलाचा दर वर्षभरात 135-140 रुपयांवरून 115-120 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठात खाद्यतेल पुरवठा साखळी युक्रेन रशिया युद्धामुळे विस्कळीत झाली होती. ती आता पूर्वपदावर आली आहे. शिवाय खाद्यतेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी,दर आणि देशभरात झालेले तेलबियांचे एकूण उत्पादन या सगळ्यावर अवलंबून असते आणि त्यामुळे यंदाच्या वर्षी किमती कमी होण्यामागची ही सर्व कारणे समोर आली आहे.
एकीकडे कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे इतर चैनीच्या वस्तूंमध्ये सुद्धा महागाई पाहायला मिळते. मात्र यामध्ये खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्याने सर्वसामान्यांना या आवाक्याबाहेर होणाऱ्या महागाईतून थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळतोय.
'ओपेक' देशांकडून प्रति दिन 10 लाख बॅरेल्सनं उत्पादन कमी करण्याचा निर्णय
खाद्य तेलाचे दर स्वस्त होत असताना दुसरीकडे आता इंधन दरवाढीचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेल उत्पादक देशांनी तेलाचं उत्पादन दिवसाला तब्बल 10 लाख बॅरेलनं कमी करण्याता निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियानं (Saudi Arabia) म्हटलं आहे की, ते मे महिन्यापासून 2023 अखेरपर्यंत तेल उत्पादनात (Oil Production Cut) दररोज पाच लाख बॅरलनं कपात करणार आहे. तसेच, सौदी अरेबियासह, इराणसारख्या इतर काही तेल उत्पादक देशांनीही तेल उत्पादनात एकूण 1.15 दशलक्ष बॅरल कपात करण्याची घोषणा केली आहे. तेल उत्पादक देशांनी उचललेल्या या पावलांमुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.