Maharashtra Coronavirus Updates: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाबाधितांची संख्या (Coronavirus Surge) वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे तज्ज्ञांनी कोरोनाला घाबरू नये असे आवाहन केले आहे. हा कोरोना नवीन नसून देशात लॉकडाऊन लागू होणार नाही, असे डॉ. रमण गंगाखेडकर (Dr. Raman Gangakhedkar) यांनी म्हटले. डॉ. गंगाखेडकर हे इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख होते. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका अदा केली होती. 


डॉ. गंगाखेडकर यांनी म्हटले की,  कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याबद्दल माध्यमांनी वार्तांकन करणे बंद केलं पाहिजे. 140 कोटी लोकसंख्येच्या तुलनेत आता समोर येत असलेले बाधितांचे आकडे नगण्य आहेत. त्यामुळे अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी म्हटले. 


हा कोरोनाचा नवा प्रकार घातक नसून मृत्यूदर वाढत नाही. मात्र, त्याचा प्रसार होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 


लॉकडाउन लागणार?


सध्या ज्या व्हेरिएटंमुळे बाधितांचे प्रमाण वाढू लागले आहेत, तो कोरोनाचा प्रकार नवा नसल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोनाच्या प्रसारामुळे देशात कुठेही लॉकडाऊन लागणार नसल्याचा अंदाज वर्तवताना मृत्यूचा आकडा वाढणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, ज्यांचे वय अधिक आहे, ज्यांना असाध्य रोग आहे अशाच नागरिकांचे दुर्दैवाने याच्यामध्ये बळी जाऊ शकतात. मात्र, त्याचे प्रमाणही अतिशय कमी असेल असेही त्यांनी म्हटले. 


दहा नव्या लसी येणार


डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटले की, दहा नव्या लसी जगभरामध्ये येत आहेत. या नव्या लसी कोरोनाविरोधात लढण्यासाठी 'मॅजिक' असल्यासारखे काम करतील. आपल्या सरकारनं जे आता उपाय हाती घेतले आहेत ते दुसऱ्या लाटे मध्ये आलेल्या अनुभवाच्या आधारावर आहेत. म्हणून कुणीही घाबरून जाऊ नये, असेही डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटले. 


बुस्टर डोस घेतलाच पाहिजे: डॉ. गौतम भन्साळी


बॉम्बे रुग्णालय तसेच कोव्हिड टास्क फोर्स सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांनी बुस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला आहे. कोविड रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र आता पुन्हा वाढत आहेत. अशात बूस्टर डोस ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी ते घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले. तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल तरी तुम्हाला कोविड होऊ शकतो. मात्र आजाराची तीव्रता असते हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. को-मॉर्बिडिटीच्या रुग्णांना अधिक होता असतो. अशात त्यांनी बूस्टर डोस घ्यावा असे त्यांनी म्हटले.


मॉकड्रीलमध्ये काय होतं?


कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. बाधितांची संख्या वाढत असून या महिन्यात आणि पुढील महिन्यात एक मोठी वाढ आपल्याला दिसून येऊ शकते. त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयार राहावं म्हणून मॉकड्रील गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही बॉम्बे रुग्णालयात मॉकड्रील केले आहे. यामध्ये आयसीयूमध्ये 14 बेड्स आम्ही तयार ठेवले आहेत. मात्र अजून एकही रुग्ण आमच्याकडे दाखल झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली. खासगी रुग्णालयांना देखील आयसीयू बेड्स तयार ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. मॉकड्रीलमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडिसिविर, औषधं तयार ठेवणं आणि त्याचा आढावा यामध्ये आमच्याकडून घेतला जातो, असेही डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले. 


मास्कदेखील वॅक्सिन


राज्य सरकार आणि पालिकेला आम्ही विनंती केली आहे की त्यांचे कर्मचारी असतील किंवा रुग्णालय असतील तेथील लोकांनी मास्क परिधान करावेत.  ज्या लोकांना सर्दी, खोकला, ताप आहे अशांनी मास्क घातलं पाहिजे. कोविडच्या लढाईत मास्क हा देखील एक वॅक्सिनच आहे,असेही त्यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: