Maharashtra Corona vaccination : राज्यातील लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकार औरंगाबाद पॅटर्न राबविण्याच्या तयारीत आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना रेशनिंग दुकान, गॅस एजन्सी आणि इतर सरकारी कार्यालयात प्रवेश न देण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हात हा पॅटर्न राबवल्यानंतर लसीकरणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचा जिल्हाधिकारी यांचा दावा आहे.
औरंगाबाद जिल्हात रोज 12 हजार पर्यंत लसीकरणाच प्रमाण होतं. आता या निर्णयानंतर 21 ते 24 हजार पर्यंत लसीकरण वाढल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यभर हा निर्णय राबविण्याची मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून निर्णय घेतील यावर ही चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
नोव्हेंबर अखेरपर्यंत पहिला आणि ख्रिसमस अखेरपर्यंत दुसरा डोस जास्तीत जास्त पूर्ण करण्याच राज्य सरकारचं उद्दीष्ट आहे. हे दोन ही डोस यशस्वी झाल्यानंतर नवीन वर्षात दैनंदिन जनजीवन सुरुळीत करण्याची राज्य सरकारची तयारी आहे.
काय आहे औरंगाबाद पॅटर्न
औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी अत्यावश्यक वस्तू म्हणजे किराणा, स्वस्तधान्य, पेट्रोल, डिझेल आणि इतर वस्तू या लसीकरणाचा पहिला डोस घेतल्या शिवाय मिळणार नाहीत असा निर्णय घेतला. या निर्णयानंतर औरंगाबाद जिल्यात रोज 10 हजार लस वाढल्याचा दावा जिल्हाधिकारी यांनी आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याही दुकानात खरेदीसाठी लसींचा पहिला डोस घेतला नसेल तर तुम्हाला दुकानात प्रवेश दिला जाणार नाही. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील शॉपिंग मॉल, किराणा मालाचे दुकाने, बहुमजली दुकाने, कापड दुकानांचे मॉल, बहु-उत्पादन विक्री दुकानामध्ये कोरोना लसीच्या पहिल्या डोसच प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील पेट्रोल पंप, गॅस, रेशन दुकानात खरेदी करायचे असेल तर कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली जाईल. मात्र बिल देताना लसीकरणाचा पहिला डोस प्रमाणपत्र आवश्यक आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ 55% एवढे
औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ 55% एवढे आहे. हे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत कमी असून राज्यामध्ये लसीकरणामध्ये औरंगाबाद जिल्हा हा 26 व्या क्रमांकावर गेला आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी पूर्ण देशाचं लसीकरण व्हावं, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे लसीकरण अभियानात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावं, यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जात आहेत. पेट्रोल पंपधारक ,गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार ,कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. सुविधा हव्या असतील तर कोरोना लसींचा पहिला डोस घेणं बंधनकारक आहे.