Nawab Malik Press Conference : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर (Kangana Ranaut) हल्लाबोल केला आहे. स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाचा पद्म पुरस्कार तात्काळ काढून घेऊन, तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. कंगना रनौतने भारताला 1947 भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ईडीनं पुण्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीवर टाकलेल्या छाप्याबाबत स्पष्टीकरण दिलं. यावेळी त्यांनी कंगाना रणौतच्या वक्त्यव्याचाही समाचार घेत पद्म पुरस्कार माघारी घेण्याची मागणी केंद्राकडे केली. नवाब मलिक यांच्याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पत्रकार परिषद घेत कंगानाच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत पद्म पुरस्कार माघारी घेण्याची मागणी केली होती.


कंगनावर हल्लाबोल 
कंगना रनौत म्हणते १९४७ मध्ये स्वातंत्र्य नव्हे भीक मिळालं, २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळालं, या त्यांच्या वाक्याचा निषेध करतो. गांधींपासून अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा अपमान आहे.  कंगनाचा पद्म पुरस्कार पुरस्कार घ्या, कंगनाचं वक्तव्य स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे. तात्काळ पद्मश्री परत घ्या, तिच्यावर स्वातंत्र्यवीरांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असं नवाब मलिक म्हणाले.


कंगना काय म्हणाली होती? 
एका मुलाखतीत कंगना रणौत हिनं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली की, 'स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का?  सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं.'


पुण्यातील ईडीच्या छाप्यावर स्पष्टीकरण -
नवाब मलिकांवर ईडीने छापे मारले अशा अफवा पसरवण्यात आल्या. मात्र मला ईडीच्या लोकांना सांगायचं आहे, अफवा पसरवणं बंद करा, प्रेस घ्या किंवा नोट काढून लोकांना खरी माहिती सांगा, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावरील आरोपाचं खंडण केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अफवांचा खेळ खेळू नका, काल पुण्यात ज्या कारवाया सुरु आहेत, त्या खोट्या आहेत. वक्फ बोर्ड जमिनीवरील कारवाईवरुन अफवा सुरु आहे. जमिनी ज्यांनी हडप केल्या आहेत, त्यांचं क्लीनअप मशीन आम्ही हाती घेतलं आहे. भाजपच्या माजी मंत्र्याने जमिनी लाटल्या. या क्लीनअप मशीनला ईडी सहकार्य करेल अशी आशा आहे. मालकाला खूश करण्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांचा प्रयत्न, नवाब मलिक कोणाला घाबरणार नाही, जो जो ललकारेल, त्याला करारा जबाब मिळेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha