Maharashtra Market croud : राज्यात कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने राज्य सरकारनं नवी नियमावली लागू केली आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने पसरतो आहे मात्र दुसरीकडे बाजार समित्यांमधील भाजी खरेदी करणाऱ्यांची गर्दी काही कमी व्हायला तयार नाही. राज्यातील अनेक ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये आज तुफान गर्दी पाहायला मिळाली. त्यात नागरिक कोरोना नियमांचं पालन करत नसल्याचंही अनेक ठिकाणी दिसून आलं. 


परभणीच्या  मार्केट यार्डमध्ये मोठी गर्दी 
कोरोनाच्या अनुषंगाने निर्बंध लागू केले असताना गर्दी करू नका मास्क वापरा अशा प्रकारचं आवाहन प्रशासन करत असताना परभणीच्या मार्केट यार्डात पहाटेपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली. परभणीच्या पाथरी रस्त्यावरील मार्केट यार्डमध्ये भाजी विक्रेते, बीट धारक,  भाजी खरेदीदार यांची मोठी गर्दी पहाटेपासून पाहायला मिळाली. यावेळी ना कोणाच्या चेहर्‍याचा मास्क आहे ना सोशल डिस्टन्सिंग पालन केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिका,स्थानिक प्रशासन यांचं पथकही इथे दिसत नाहीये. त्यामुळे सरकारच्या निर्बंधाचा काही फायदा झाला का असा प्रश्न निर्माण झालाय.


अमरावतीत कोरोनाचे नियम धाब्यावर  
राज्यात कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने राज्य सरकारनं रात्रीपासूनच नियमावली लागू केलीय. पण या नियमावलीचं खरच पालन होतंय का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमरावतीमध्ये नियम धाब्यावर बसवले आहेत असंच दृश्य बाजारसमितीतून समोर आलं आहे. अमरावती येथील भाजी बाजार होलसेल मार्केटमध्ये मोठी गर्दी झाली असून कोणीही मास्क घातलेला दिसत नाहीये. त्यामुळे यांच्यावर आता कोण कारवाई करणार असा प्रश्न पडला आहे. अमरावती जिल्ह्यात 1 जानेवारीपासून कोरोनाच्या आकड्यात झपाट्यात वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पूर्ण जनजागृती केली पण अमरावतीकरांनी नियम पाळणं गरजेचं आहे. 


सांगलीत सकाळच्या भाजी बाजारात गर्दी कमी, मात्र अनेकांच्या चेहऱ्यावरील मास्क गायब


कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली. यानुसार सांगली शहरातील सकाळच्या सुमारास भरणाऱ्या बाजारामध्ये या नियमांचं काही प्रमाणात पालन करताना दिसून आलं तर काही जण  अजूनही मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. सांगलीच्या शंभर फुटी रोड वरील सकाळी 2 तास भरणाऱ्या बाजारामध्ये आज काही प्रमाणात गर्दी कमी असली  तरी अजूनही काही जण मास्कचा वापर करत नसल्याचे दिसून आले.


 औरंगाबादेतल्या जाधवमंडीमध्ये लोकांना कोरोनाचा विसर 
एकीकडे कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने पसरतो आहे मात्र ,दुसरीकडे बाजार समित्यांमधील भाजी खरेदी करणाऱ्यांची गर्दी काही कमी व्हायला तयार नाही.  औरंगाबादेतल्या जाधवमंडीमध्ये लोकांना कोरोनाचा विसर पडलेला दिसला. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी ही गर्दी कमी करण्यासाठी काही पथके नेमली आहेत. मात्र, ही पथकं इथे पाहायला मिळत नाहीत .इथे बहुतेक जणांच्या तोंडाला  मास्क नाही, कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर  या गर्दीवर नियंत्रण मिळवणं महत्त्वाचं असणार आहे.


धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना नियमांचे उल्लंघन


धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. व्यापारी आणि व्यवसायिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती तर अनेकांकडून मास्कचा वापर होत नसल्याचे दिसून आले. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून 145 सक्रिय रुग्णांची संख्या आहे. यामुळे शासनाच्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 





 



महत्त्वाच्या इतर बातम्या :