Maharashtra Corona Update : राज्यात आज दोन हजार 382 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर आठ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज 11 रूग्णांची वाढ झाली आहे. शुक्रवारी राज्यात दोन हजार 371 रूग्णांची नोंद झाली होती. 


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात दोन हजार 853 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 78,53,661 रूग्ण करोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.96 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज आठ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84 टक्के एवढा आहे.


बी ए. 4 चे 4, तर बी ए. 5 चे 31 रुग्ण


बी जे वैद्यकीय पुणे यांच्या अहवालानुसार, राज्यात बी ए. 4 चे 4 तर बी ए. 5 चे 31 रुग्ण आढळले आहेत. तर बीए. 2.75 व्हेरीयंटचे देखील आठ रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए. 4 आणि बीए. 5 रुग्णांची संख्या 113 तर  बीए. 2.75 रुग्णांची संख्या 40 झाली आहे. 


मागच्या आठवड्यात राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाली होती. परंतु, या आठवड्यात पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एक हजार पर्यंत खाली आलेल्या रूग्णसंख्येने पुन्हा दोन हजारांचा टप्पा पार केला आहे. 


देशातील कोरोना रूग्णांमध्ये वाढ 
देशात आज सलग तिसऱ्या दिवशी वीस हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सक्रिय कोरोना रुग्ण आणि मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 20,044 नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकीकडे पावसामुळे वाढणारे संसर्गजन्य आजारांचा धोका दुसरीकडे देशात झालेला मंकीपॉक्स व्हायरसचा शिरकाव आणि त्यात कोरोनाचा वाढता संसर्ग यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.