मुंबई : राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हाच सर्वात उत्तम उपाय मानला जात आहे. अशातच कोरोना चाचण्या, लसीकरण यांसंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींची प्रवासाची आणि रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेत, राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना टेस्टिंग, कोरोनाबाधित झाल्यानंतरचे उपचार तसेच लसीकरण या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. 


दिव्यांग व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमी असल्याने त्यांना कोरोनाचा धोका अधिक असतो, ही बाब लक्षात घेत राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दिलासा देणारे दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. दिव्यांग व्यक्तींना संभाव्य अधिकचा धोका, प्रवासाची आणि रांगेत तिष्ठत उभे राहण्याची अडचण लक्षात घेत राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना कोरोना टेस्टिंग, कोरोनाबाधित झाल्यानंतरचे उपचार तसेच लसीकरण या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावे, त्यांना कोणत्याही रांगेत उभे करू नये, असे स्पष्ट निर्देश शासन निर्णयाद्वारे जारी करण्यात आले आहेत. तसेच या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी आरोग्य विभागाने करावी याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. 


दरम्यान, दळणवळणाची अपर्याप्त सुविधा तसेच विविध कार्यालयांमध्ये अगोदरच 15% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याची असलेली मुभा लक्षात घेत राज्य शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांना देखील कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्याचा शासन निर्णय देखील सामाजिक न्याय विभागाने घेतला असून, संबंधित कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा संबंधित विभागानं उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही देण्यात आले आहेत. 


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात येऊन पुढील आदेश  येईपर्यंत दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी यांना उपस्थितीत सूट देण्यासह दिव्यांग व्यक्तींना कोरोना टेस्टिंग, उपचार आणि लसीकरणासाठी प्राधान्य देणे हे दोनही दिलासादायक निर्णय घेतल्याबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे अनेक दिव्यांग संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना तसेच विविध सामाजिक संस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :