वर्धा :  ज्येष्ठ गांधीविचारक, चेतना विकासच्या अग्रणी व स्त्रीसक्षमीकरणाच्या कृतीशील मार्गदर्शक सुमनताई बंग आज सेवाग्राम रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्या 96 वर्षांच्या होत्या. महात्मा गांधी यांचे अनुयायी व अर्थतज्ज्ञ दिवंगत ठाकूरदास बंग यांची सहचारिणी आणि समाजसेवी अशोक बंग व डॉ. अभय बंग यांच्या मातोश्री म्हणून त्या परिचित असल्या तरी स्वतःच्या कर्तृत्वाने व व्रतस्थ सेवाकार्याने सुमनताई यांनी समाजमनावर आपला अमिट ठसा उमटवला होता. 


बचतगटाचे काम देशपातळीवरही फारसे रुळले नव्हते, त्या काळात वर्धा जिल्ह्यातील परितक्त्या व विधवा स्त्रियांना सोबत घेऊन बचत गटांचे जाळे त्यांनी निर्माण केले होते. स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी कार्यरत असतानाच शाश्वत शेती, खादी व शिक्षण प्रणालीत प्रयोगशीलता, निसर्गोपचार, कांचनमुक्ती, सामूहिक जीवन, युवकयुवतींसाठी लैंगिक शिक्षण, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, पती-पत्नी संमेलन, सासू-सून संमेलन असे अनेक अभिनव उपक्रम निस्वार्थपणे सुमनताईंनी आयुष्यभर राबविले.


अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात 1925 साली जन्मलेल्या सुमनताईंनी विद्यार्थीदशेत सेवादलाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. स्वातंत्र्योत्तर काळातही विनोबांच्या भूदान, ग्रामदान आणि ग्रामस्वराज्य आंदोलनात त्या सहभागी होत्या. पुढे जयप्रकाश नारायण यांच्या समग्र क्रांती आंदोलनातही सहभागी होत त्यांनी स्त्रियांचे नेतृत्व केले होते. 


जगण्यात साधेपणा आणि विचारांमध्ये वैज्ञानिकता स्वीकारलेल्या सुमनताई बंग यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीतही करण्यात आले. त्यांच्यापश्चात नातलगांसोबतच सामाजिक कार्यातून जुळलेला मोठा परिवार पोरका झाला आहे.