मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या आणि पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर दिसून आला. अशातच यशराज फिल्मसच्या यश चोप्रा फाउंडेशनच्या वतीनं मजूर, तंत्रज्ञ आणि लहान कलाकारांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यशराज फिल्म्सनं इंडस्ट्रीतील एकूण 30,000 लोकाचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाहीतर यशराज फिल्मच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमासाठी लागणारे लसींचे डोस उपलब्ध करुन देण्याचं आवाहन केलं आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'द यश चोपड़ा फाउंडेशन'च्या वतीनं लिहिण्यात आलेल्या या पत्राची एक प्रत एबीपी न्यूजच्या हाती लागली आहे. ज्यामध्ये इंडस्ट्रीमधील 30,000 कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लसीचे डोस उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. या पत्रात हेदेखील लिहिलं आहे की, ज्या 30,000 कर्मचाऱ्यांना फाउंडेशनच्या वतीनं मोफत लस देण्यात येणार आहे, त्यांच्या लसीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा सर्व खर्च यश चोप्रा फाउंडेशन करणार आहे. 


यशराज फिल्मच्या वतीनं लिहिण्यात आलेल्या या पत्राव्यतिरिक्त फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज ‌(FWICE) ने देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या आशयाचं पत्र लिहिलं आहे आणि लवकरात लवकर इंडस्ट्रीमधील कर्मचाऱ्यांसाठी लस उपलब्ध करण्याचं आणि एक वेगळं लसीकरण केंद्र देण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. 


एबीपी न्यूजशी बोलताना फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी सांगितलं की, "यशराज फिल्म्सच्या वतीनं घेण्यात आलेल्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमच्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, यश चोप्रा फाउंडेशनच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांना केवळ एकच नाहीतर दोन लसीचे डोस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे."


फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी सांगितलं की, "आम्हाला आशा आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेडरेशन आणि यशराज फिल्म्सच्या मागणी लवकरात लवकर मान्य करतील, जेणेकरुन लसीकरणाचं हे अभियान लवकराच लवकर सुरु होण्यास मदत होईल. आमचे सगळे कर्मचारी कोरोना संकटासोबतच भूकेच्या संकटाशीही लढा देत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी लवकरात लवकर लसीकरण अभियान सुरु करणं अत्यंत आवश्यक आहे."


महत्त्वाच्या इतर बातम्या :