मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भारतातला कोरोनाचा टक्का वाढू लागला आहे. त्याची दखल जगातल्या अनेक मुख्य देशांनी घेतलीय. ऑस्ट्रेलियाने आपली भारतावरून येणारी उड्डाणं रद्द केली, तर अमेरिकेच्या नेत्यांनी भारतात लॉकडाऊन असायला हवा असा सल्ला दिला. अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कलाकारांनी सोशल मीडियावर भारतात उद्भवलेल्या स्थितीबद्दल हळहळ व्यक्त केली. भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राही यात मागे नव्हती. तिनेही सोशल मीडियाद्वारे भारतात कोरोना वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. 


प्रियांकाने केवळ चिंता व्यक्त न करता आपल्या देशासाठी काहीतरी करायचं ठरवलं. यातूनच तिने 'गिव्ह इंडिया' या कॅम्पेनला सुरुवात केली. भारतातली स्थिती व्हिडीओद्वारे दाखवतानाच आता भारताला मदतीची गरज असल्याचं सांगितलं. इन्स्टाग्राम, ट्विटर या आपल्या सोशल मिडीयावरून तिने हे व्हिडिओ पोस्ट करत 'गिव्ह इंडिया'ची माहिती दिली होती. तिच्यासोबत तिचा नवरा पॉपस्टार निक जोनस यानेही भारताला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. वैद्यकीय सुविधा, औषधं आदींसाठी हा निधी वापरला जाणार असल्याचं सांगितलं गेलं. आता काही दिवसांतच प्रियांकाच्या या आवाहनाला जगभरातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. 


काही परदेशी वेबसाईट्सनी दिलेल्या वृत्तानुसार प्रियांकाच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जवळपास पाच कोटींचा निधी जमला आहे. एकूण किती निधी जमला याची अधिकृत घोषणा प्रियांकाने अद्याप केलेली नाही. पण गेल्या तीन दिवसांत या गिव्ह इंडिया कॅम्पेनला पाच कोटींची मदत झाल्याचं कळतं. गिव्ह इंडिया या कॅम्पेनमधून भारताला मदत करायचं आवाहन प्रियांका आणि निकने अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनाही केलं आहे. 


प्रियांकाचा सोनूला पाठिंबा


भारतातली स्थिती पाहता प्रियांका आणि निक सातत्याने आपल्या सोशल मिडीयावरून लोकांना मदतीचं आवाहन करत आहेत. आता भारतात काही कलाकार कोरोनाविरोधात लढत असताना दिसतायत. त्यांना प्रियांका पाठिंबा देऊ लागली आहे. अभिनेता सोनू सूदने मुलांसाठी काम करायचं ठरवलं आहे. कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक हयात नाहीत अशा मुलांचा शैक्षणिक खर्च सरकारने करावा असं सोनूनं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. शिवाय त्याची एनजीओ अशा मुलांसाठी काम करणार आहे. तर प्रियांकाने सोनूच्या या कल्पनेला पाठिंबा देत त्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकून शेअर केला आहे.


प्रियांकाने यापूर्वीही भारतात घडत असलेल्या गोष्टींवर कायमच आपलं मत मांडलंय, युनिसेफसोबत तिने बरीच वर्ष काम केलंय आणि त्या संस्थेमार्फत अनेक देशांना मदतही केलीय. प्रियांका आणि निकच्या या आवाहनाला शॉन मेंडेस, कमिला कॅबेलोसारखे मोठे गायकही चांगला प्रतिसाद देत आहेत. लवकरच याबद्दलची अधिकृत घोषणा प्रियांका करणार असल्याची माहिती आहे.