नांदेड : एकीकडे जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन सांगतेय की कोरोना रूग्णांसाठी प्रशासन सज्ज आहे. मात्र, दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या दाव्याचे पोलखोल करणारे वास्तव स्वतः रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक पुढे आणत आहेत. कालच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर, रेमडेसिवीर व बेडची कोणतीही कमतरता नसून येणाऱ्या परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासन सज्ज असल्याची माहिती दिलीय. मात्र, आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनाची व ग्रामीण भागातील परिस्थिती या पेक्षा वेगळीच व अलबेल असल्याची पोलखोल रुग्णांच्या नातेवाईकांनी केलीय.
मंगळवारपासून हदगाव येथील कोविड सेंटरमधील एका रुग्णाच्या नातेवाईकांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भयान वास्तव समोर आणलंय. कारण हदगाव येथील कोविड सेंटर मधील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणाच्याही अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओत एक मृतदेह बेडवर कपड्यात गुंडाळून ठेवलेला आणि एकजण नुकताच मृत झालाय. मृतदेहाच्या बाजूलाच इतर अनेक रुग्ण उपचार घेत आहे. हे पाहुन कुणाच्याही काळजात धडकी भरल्या शिवाय राहणार नाही. या ठिकाणी घाणीचे साम्राज्यही पसरलेलं दिसत आहे. ज्या ठिकाणी रुग्णांवर उपचार केला जातोय, त्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य असून त्याच ठिकाणी रुग्णांवर उपचार चालू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हदगावच्या कोविड सेंटरमधील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा
राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना कोरोना बाधित रुग्णांवर प्रभावी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आज रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा झालेला नाही. रेमडेसिवीरची निर्मिती करणाऱ्या प्रमुख सात कंपन्या आहेत. त्यातील महत्वाची हेटरो लॅब लिमिटेड या हैदराबाद स्थित कंपनीचा हैदराबादमधील प्लांट बंद असल्याने या कंपनीकडून रेमडेसिवीरचा पुरवठाच बंद करण्यात आलाय. परिणामी राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे.