Maharashtra Corona Cases : राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. नवीन रुग्णांची आकडेवारी कमी होत असून तुलनेनं डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी जास्त येत आहे. आज राज्यात 42582 नव्या रुग्णांची नोंद तर 54535  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 4654731 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.34% एवढे झाले आहे. 


राज्यात आज 850 कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे.राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 30351356 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5269292 (17.36टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3502630 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28847 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज रोजी एकूण 533294 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 



मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज पुन्हा घट


मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज पुन्हा घट झाली आहे. मुंबईत आज  1,946 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2,037 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 68 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 38 हजार 649 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  मुंबईत काल 2116 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर 4293 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मुंबईचा डबलिंग रेट हा आता 189 दिवसांवर गेला आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर गेले आहे.  


मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यूदर जास्त


मुंबई महापालिकेच्या कामगिरीचं देशभरात कौतुक होत असलं तरीही मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यूदर जास्त असल्याचं आकडेवारीवरुन समोर येतंय. मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण स्थिरावले आहेत मात्र त्या तुलनेत रुग्णांच्या मृत्यूची मात्र घट होताना दिसत नाही. ही गोष्ट चिंतेची आहे. कोरोनाच्या संकटात मुंबई महापालिकेच्या व्यवस्थापनाचं सुप्रीम कोर्टासह निती आयोगाने कौतुक केलं. मात्र त्याच मुंबईत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसात मुंबईतला मृत्यूदर वाढतोय. 



  • 14 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान हा मृत्युदर 0.6 टक्के होता.

  • 21 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान मृत्युदर 1.14 टक्क्यांवर पोहोचला. 

  • 28 एप्रिल ते 4 मे दरम्यान मृत्युदर 2.17 टक्क्यांपर्यंत पोहोचला.

  • 5 मे ते 11 मे दरम्यान मृत्यूदर 2.27 टक्क्यांपर्यंत पोहोचला.


पुणे शहरात दिवसभरात नवे 2 हजार 393 कोरोनाबाधित! 
पुणे शहरात आज नव्याने 2 हजार 393 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 54 हजार 457 इतकी झाली आहे. दिवसभरात शहरातील 4 हजार 135 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 21 हजार 672 झाली आहे.  पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 25हजार 222 रुग्णांपैकी 1372  रुग्ण गंभीर तर 6302  रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात 12 हजार 738 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 23 लाख 62 हजार 302 इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 50 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 7 हजार 563 इतकी झाली आहे.