सोलापूर : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या सदस्यालाच कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन सदस्यीय पथक कालच सोलापूर शहरात दाखल झाले होते. पुण्यातून वाहनाद्वारे सोलापुरात आलेल्या पथकाच्या वाहन चालकाला त्रास जाणवत होता. वाहन चालकाची रॅपिड अँटिजन चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे या दोन्ही सदस्यांची देखील आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती.
आज दोन्ही सदस्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एका सदस्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सदस्याचे वय 69 वर्ष आहे. त्यामुळे त्यांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर पथकातील दुसऱ्या सदस्यांना शासकीय विश्रामगृह येथे क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे.
सोलापुरातील अधिकाऱ्यांची चिंता वाढली
केंद्रीय पथक सोलापुरात दाखल होताच स्थानिक प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी सोलापुरातील स्थितीचा आढावा या केंद्रीय पथकाने घेतला होता. त्यामुळे या बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांची चिंता देखील वाढली आहे. मात्र या अधिकाऱ्यांची चाचणी केली जाते का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
सोलापुरातील पाहणी करण्यासाठी दुसरे पथक येणार - उपजिल्हाधिकारी
सोलापूर जिल्ह्यात दररोज 700 ते 800 रुग्ण आढळत आहेत. तर दररोज जवळपास 10 लोकांचा कोरोनामुळे बळी जातोय. सोलापूर जिल्ह्यात परिस्थिती गंभीर होत असताना केंद्राचे पथक पाहणी करुन स्थानिक प्रशासनाला सुचना करणार होते. तसेच परिस्थितीचा अहवाल केंद्रीय आरोग्य विभागाला पाठवणार होते. मात्र आता केंद्रीय पथकाचे सदस्य रुग्णालयात आणि क्वॉरन्टाईन असल्याने पाहणी कशी होईल असा प्रश्न उपस्थित होता. मात्र जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी दुसरे पथक येईल. हे पथक जिल्ह्याच्या स्थितीचा आढावा घेईल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.