मुंबई : निसर्ग चक्रीवादळने आपले रौद्र रुप दाखवायला सुरुवात केली आहे. कोकण किनारपट्टीवर रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ श्रीवर्धन, दिवेआगर येथे हे वादळ धडकले आहे. चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परिघ 60 किलोमीटर इतका मोठा आहे. वादळ किनाऱ्यावर धडकताना (लँडफॉल) वाऱ्यांचा वेग 100 किलोमीटर प्रतितास इतका वेगवान असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय. चक्रीवादळ वेगाने ताशी 55 किमी वेगाने मुंबईच्या दिशेन सरकत आहे. या वादळामुळे कोकण किनारपट्टी प्रभावित झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकले असून मोठ्या प्रमाणात वारा सुटला आहे. रायगडमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. शिवाय आकाशावर अधिराज्य गाजवणारी घार देखील या तडाख्यातून सुटली नाहीय. जवळपास 25 ते 30 घारी या पावसाच्या तडख्यामुळे जमिनीवर कोसळून पडल्या होत्या. त्यांना स्थानिक नागिरकांनी जीवनदान दिले आहे. निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकल्यानंतर मुंबईतही वाऱ्याचा वेग वाढू लागला आहे. यामुळे दक्षता म्हणून वरळी-वांद्रे समुद्र सेतूवरचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालक माघारी फिरत असून पुढील सूचना येईपर्यंत सी-लिंक बंद असल्याची माहिती पोलीस अधिकऱ्यांनी दिली.


निसर्ग वादळामुळे मच्छीमारांनी बोटी किनाऱ्यावर लावल्या असल्या तरी वाऱ्याचा वेग वाढल्याने आणि उसळणाऱ्या लाटांमुळे या बोटी सुटण्याची भीती मच्छीमारांमध्ये आहे. यामुळे त्यांना पुन्हा एकदा बोटी बांधाव्या लागत आहेत. तसेच कच्च्या घरातील लोकांना पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी समन्वय साधून इतरत्र स्थलांतरित करत आहेत.


मुंबई किनारपट्टीवरील नागरिकांचे स्थलांतर


मुंबईच्या किनारपट्टीवर निसर्ग वादळ आदळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्याचे काम मुंबई पोलीस आणि महानगर पालिकेतर्फे करण्यात येत आहे. गीतानगरमधील 11 हजार लोकांना स्थलांतरित करण्याचं काम यावेळेस करण्यात आलं आहे.


ठाणे जिल्ह्यात हाय अलर्ट


निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याला देखील हायअलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान पोहोचलेले आहेत. या चक्रीवादळाचा तडाखा ठाणे जिल्ह्याला बसल्यास कोणतीही आपत्ती उद्भवल्यास हे जवान तात्काळ नागरिकांच्या मदतीला धावण्यासाठी सज्ज झालेले आहेत. या दलामध्ये 30 जवान आणि 3 अधिकारी यांचा सहभाग आहे.


नवी मुंबई, पनवेलमध्ये संततधार


नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत. दुसरीकडे सुसाट्याचा वारा वाहत असल्याने अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. दोन्ही महानगरपालिका आयुक्तांनी नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन केले आहे. वाऱ्यामुळे विजेचे खांब पडण्याची, वायर तुटण्याची शक्यता असल्याने महावितरण विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागातील लाईट बंद ठेवली आहे. आपत्कालीन विभाग, अग्निशमन विभाग तैनात करण्यात आले आहेत.


प्रशासन सज्ज


'निसर्ग' चक्रीवादळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. दूरध्वनीद्वारे वेळोवेळी सद्यस्थितीचा आढावा घेत आहेत. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त लोकेशचंद्र हेदेखील उपमुख्यमंत्र्यांना सद्यस्थितीची माहिती देत आहेत. वादळाचा जोर ओसरेपर्यंत कोकण किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.