मुंबई : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ आले असून  ते आज अलिबागला धडकण्याचा अंदाज आहे. इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे. 'निसर्ग' चक्रीवादळामुळं मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली होती. यानुसार राज्यात मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.


ताशी 12 किमी वेगानं निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास सुरु आहे. किनारपट्टीवर धडकताना 110 किमी वेगाने धडकण्याची शक्यता आहे. किनारपट्टी क्षेत्रात वाऱ्याचा वेग वाढला आहे. तासागणिक निसर्ग चक्रीवादळ पुढं सरकत असल्याची माहिती आहे. यावेळी निसर्ग चक्रीवादळ अलिबागपासून 140 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 190 किलोमीटर अंतरावर आहे. चक्रीवादळ दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम मुंबईवर काल रात्रीपासून जाणवू लागला होता. मुंबईमध्ये रात्री ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरासह दक्षिण मुंबईत देखील जोरदार पाऊस बरसत होता. मध्य मुंबईत पावसाच्या हलक्या बरसत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारनंतर सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात होण्याचा अंदाज आहे. तेव्हा दाट लोकवस्ती असलेल्या कुर्ला, सायन, चेंबूर सारख्या सखल भागात पाणी साचण्याचा धोका प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे.  नवी मुंबईत देखील काल सायंकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. पनवेल, कामोठे, खारघरसह जवळपास संपूर्ण नवी मुंबईत पावसाची रिपरिप सुरुच आहे.

वसई विरार क्षेत्रात काल सायंकाळपासून सुरु असणारा पाऊस सकाळी देखील सुरु होता. वसई विरार क्षेत्रातील सर्व रस्ते ओलेचिंब झाले आहेत. उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना वातावरणातील गारव्याचा अनुभव मिळत आहे. मात्र आज आणि उद्या निसर्ग चक्रवादलाचा संकट वसई विरार पश्चिम किनारपट्टी घोंघावत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.  सकाळच्या वेळेत तरी आणखी चक्रीवादळाचे कोणतेही पडसाद वसई, विरार अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर दिसून आले नाहीत. मच्छीमार बांधवांकडून बोटीतील सर्व सामान काढून सुरक्षित स्थळी हलवणे सुरू आहे. समुद्रात हलक्या लाटा वाढत आहेत. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत वसई तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 300 च्या वर नागरिकांना स्थलांतरीत केले आहे.

पालघर जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू

अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा धोका  कायम असून पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील समुद्रात मच्छीमारी साठी गेलेल्या सर्व बोटी रात्री 11 वाजेच्या दरम्यान सुरक्षित माघारी  परतल्या आहेत.  रात्रभर जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू असून वातावरण ढगाळच आहे, तर दुसरीकडे समुद्र काठावरील व आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन कडून देण्यात आल्या असून धोकादायक ठिकाणच्या नागरिकांना इतरत्र सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे

रत्नागिरीत रात्रभर पावसाचा जोर आणि सोसाट्याचा वारा

रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर पावसाचा जोर आणि सोसाट्याचा वारा आहे. पहाटेपासून हा जोर देखील वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील मंडणगड. दापोली आणि गुहागरला चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील वीजपुरवठा देखील खंडित करण्यात आला असून 9 ते 12 या वेळात ताशी 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या इतर किनारपट्टी भागाचा विचार करता रत्नागिरी आणि राजापूर हा भाग कमी प्रभावित होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यात आणखी एक एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली असून एक तुकडी दापोली तर दसरी मंडणगड येथे थांबणार आहे.
पुण्यात पहिल्या पावसानंतर कामांची पोलखोल

पुण्यात आज पहिल्या पावसानंतर पुणे महानगरपालिकेने केलेली पावसापूर्वी कामांची पोलखोल झाली आहे. पुण्यात काल झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. वडगाव शेरी याठिकाणी असलेल्या काही सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं तर अनेक लोकांच्या घरांमध्ये देखील पाणी भरला आहे. तसेच अनेक रस्त्यांवर देखील पाणी साचल्याचे चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळालं.


सिंधुदुर्गातही पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मान्सून पूर्व पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. आज आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नागपुरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर शहर आणि परिसरात रात्रभर पाऊस सुरू आहे. आता देखील हलक्या सरी सुरू आहेत. नागपुरात कालपासून वातावरण ढगाळलेले आहे.

सातारा : चक्रीवादळाचा परिणाम सातारा भागातही दिसू लागला आहे. आज सकाळपासूनच पाटण, महाबळेश्वर सह साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाने चागंलाच जोर पकडला आहे. बदलत्या वातावरणामुळे सातारा प्रशासकीय यंत्रणेने सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर, वाई भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. लोकांनी विनाकारण घरातून बाहेर पडू नये असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. रात्री 12 वाजेपासून महाबळेश्वरमध्ये 41.0 मिमी, पाचगणी 12.3 मिमी,  तापोळा 18.6 मिमी,  लमाज 32.4 मिमी, पाटण 40.5 मिमी पाऊस पडला आहे.

Nisarga Cyclone | अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळाचा धोका, राज्यात NDRF तैनात