पुणे : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राजभवन हे भाजप कार्यालय झालं आहे. राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे वागत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. पटोले यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. आज पुण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण राज्यामध्ये ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पटोले बोलत होते. 


Maharashtra Politics :भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवा, काँग्रेसच्या नाना पटोले यांची मागणी


पटोले म्हणाले की, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल राज्यपाल बोलले.  देशाचं वाटोळं नेहरू यांच्यामुळे झालं असं ते बोलले.  राज्यपाल पदावर बसून राजकारण करता येत नाही . राजभवन हे भाजप कार्यालय झालं आहे, राज्यपाल  भाजप कार्यकर्त्यासारखे वागत आहेत. विधानसभेतही मी हे बोललो आहे, असं ते म्हणाले. 


चीन कधीही हल्ला करेल, त्याबाबत मोदी बोलत नाहीत 
नाना पटोले म्हणाले की, कधीही देशावर हल्ला होऊ शकतो. चीन कधीही हल्ला करेल, त्याबाबत मोदी बोलत नाहीत.  माध्यमांनी आता काही लिहिलं तर केंद्र त्यांना नोटीस पाठवते, कारवाई करते.   तेव्हा हुकूमशाही होती, आताही झाली.  इंग्रजांचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये काहीही बदल राहिला नाही.   त्यावेळी राजीव गांधींची मोठी बदनामी केली गेली.   देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं, त्यांनाच बदनाम केलं असं ते म्हणाले. 


 काही लोक दिल्लीत माझ्याबद्दल तक्रार करतात
पटोले म्हणाले की,  संविधानाने मला दिलेला अधिकार हिरावला जातोय .   मी जहाल आहे असं म्हणतात. काही लोक दिल्लीत माझ्याबद्दल तक्रार ही करतात, असंही ते म्हणाले. 


चांगलं काम करूनही टॉर्चर केलं जातंय


पटोले म्हणाले, न्यायव्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्थेची केंद्र सरकारने काय अवस्था करून ठेवली आहे. IAS, IPS लोक राजीनामा देताय, कंटाळून नोकऱ्या सोडत आहेत. एक जण मला भेटला आणि मुस्लिम असल्यानं मला चांगली वागणूक दिली जात नाही असं म्हटला. चांगलं काम करूनही टॉर्चर केलं जातंय.  काहीही सांगायचा अधिकार राहिला नाही, असं पटोले म्हणाले.