Nagpur News : महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे 'भारत जोडो' यात्रेत (Bharat Jodo Yatra) जखमी झाले आहेत. हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. नितीन राऊत हे हैदराबाद येथे 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी गर्दीत त्यांना धक्का लागला आणि तोल गेल्याने ते पडले. त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ इजा झाली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा तेलंगणात दाखल झाली आहे. नितीन राऊत हे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालत असताना कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी होती. सामान्य जनता, कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या भेटीसाठी धडपड करीत होते. या गर्दीतून मार्ग काढत राहुल यांच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करीत होते. अशाच प्रयत्नात कुणाचा तरी राऊत यांना धक्का लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी रात्री सिटीस्कॅन करण्यात आले. त्यांची जखम फारशी गंभीर नसल्याची माहिती देण्यात आली. डाव्या डोळ्याजवळ जखम झाली असून डोक्याला मार लागला आहे.
पूजा भट्टही भारत जोडो यात्रेत सहभागी
भारत जोडो यात्रेत सहभागी होणारी पूजा भट्ट (Pooja Bhatt) पहिलीच बॉलिवूड सेलिब्रिटी आहे. अभिनेत्री पूजा ही हैदराबादमध्ये यात्रेत सहभागी झाली. तेलंगणातील हैदराबाद शहरातून आज सकाळी 'भारत जोडो' यात्रा सुरू झाली. त्यावेळी अभिनेत्री पूजा भट्ट यात्रेत सहभागी झाली.
महाराष्ट्रात तयारी सुरू
राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भारत जोडो' यात्रा हह 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश कमिटीकडून भारत जोडो यात्रेसाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूरपासून भारत जोडो यात्रेचा टप्पा सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आदित्य ठाकरेदेखील यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. 'भारत जोडो' यात्रेतंर्गत राहुल गांधी नांदेड, बुलढाणामध्ये जाहीर सभा घेणार आहेत.
महत्त्वाची बातमी