Narendra Singh Tomar : कृषी क्षेत्रातील (Agricultural sector) जागतिक स्पर्धेत अग्रेसर होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची गरज असल्याचे मत केंद्रीय  कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी व्यक्त केले. कृषी क्षेत्रात काळानुरुप बदल करुन शेतकऱ्यांना संपन्न करण्याची गरज आहे. ग्रामीण क्षेत्र हा देशाचा आत्मा असून, कृषीक्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचं तोमर म्हणाले. वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत "फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी' या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्र्यांच्या हस्ते फलोत्पादन क्षेत्रातील योगदानाबद्दल शेतकरी, एफपीओ, कृषी आधारित स्टार्ट-अप, उद्योजक, बँकर्स यांचा सत्कार करण्यात आला.




ॲग्री स्टार्टअप, कृषी विमा, बाजारपेठेची उपलब्धता आदीद्वारे शेतकऱ्यांना संपन्न करण्याचे प्रयत्न होत आहेत. सुशिक्षित युवकांनी नव्या तंत्राचा वापर करून शेती करावी यासाठी सुविधा देण्यात येत आहेत. याचा परिणाम म्हणून नवी पिढी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे आकर्षित होत असल्याचे तोमर यावेळी म्हणाले. नैसर्गिक शेतीकडे शेतकरी आकर्षित होत आहेत. कृषी क्षेत्रात नवे प्रयोग करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊन देशाला कृषी क्षेत्रातील अग्रणी राष्ट्र बनवता येईल असेही तोमर म्हणाले.


ग्रामीण क्षेत्र देशाचा आत्मा


ग्रामीण क्षेत्र देशाचा आत्मा आहे. शहरासोबतच देशातील ग्रामीण भाग स्वच्छ आणि संपन्न होणं गरजेचे आहे. गाव स्वावलंबी झाल्यास देश स्वावलंबी होईल. यादृष्टीनं कृषी क्षेत्रात कार्य करणारा शेतकरी उपजीविकेसोबत देशाच्या प्रगतीत योगदान देता येते. कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशाच्या समृद्धीसाठी  क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करावे लागेल, असेदी तोमर यांनी यावेळी सांगितलं.




लहान शेतकऱ्यांना एकत्रितपणे काम करावं


देश खाद्यान्न उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. इतर शेती उत्पादनातही पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाला फुलशेती, फलोत्पादन आणि भाजीपाला उत्पादनाच्या क्षेत्रातही चांगली संधी आहे. केंद्र सरकार क्लस्टर कार्यक्रम, शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ), फलोत्पादन मिशनद्वारे लहान शेतकऱ्यांना एकत्रितपणे काम करून उत्तम गुणवत्तेचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे तोमर यांनी सांगितले. यामुळं शेतकऱ्याला दर्जेदार उत्पादन घेणं शक्य होणार आहे. उत्पादनाच्या खरेदीसाठी ग्राहक स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचेल असंही ते म्हणाले. 


भरडधान्यासह भाजीपाला उत्पादनावर लक्ष देण्याची गरज


आज पारंपरिक खाद्यान्न शेतीसोबत फलोत्पादन, भरडधान्य आणि भाजीपाला उत्पादनावरही लक्ष द्यावे लागेल. भारताच्या प्रयत्नामुळे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे होणार आहे. फलोत्पादन आणि प्रक्रिया उद्योगाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासोबत रोजगार निर्मितीही होईल. हे करताना शेतकऱ्याला अधिक लाभ होईल याचा विचार या साखळीतील इतर घटकांनी करायला हवा. आर्थिक प्रतिकुलतेतही कृषी क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे कार्य करत असल्यानं त्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल असेही तोमर यांनी सांगितलं.




कृषीभूषण अंकुश पडवळे यांचा कृषीमंत्र्यांच्या हस्ते सन्मान


राष्ट्रीय स्तरावरील शेती व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल कृषीभूषण अंकुश पडवळे यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सेंद्रिय शेती, करार शेतीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या पुढे आदर्शवत काम पडवळे यांनी केले आहे. दुष्काळी भागात अत्यंत कमी पाण्यावर शेततळ्यांच्या माध्यमातून त्यांनी आदर्शवत काम केले आहे. तसेच गटशेतीच्या माध्यमातून शेडनेट शेतीचे मोठे काम केले आहे. पडवळे यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानेही त्यांनी कृषीभूषण पुरस्कारानं यापूर्वीच सन्मानित केले होते. आता त्यांना राष्ट्रीय स्तरावरील शेती व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कार दिला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Food Production : भारत अन्न उत्पादनात स्वयंपूर्ण, जगातील मोठ्या भागाची अन्नाची गरज भागवण्याची भारतात क्षमता : कृषीमंत्री