मुंबई : शिवसेना-भाजप...गेली अनेक वर्षे एकमेकांसोबत असलेले हे मित्रपक्ष...सध्या जरी हे दोन्ही पक्ष एकत्र नसले तरी हे दोन्ही पक्ष कधीही एकत्र येतील अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यातच आज विधानभवन परिसरात एक किस्सा घडला. एकमेकांवर आरोप करणारे आज एकमेकांसोबत हसताना दिसले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या ठिकाणी होते. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाययक मिलिंद नार्वेकर यांनी तर चक्क विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्या मनगटावर शिवबंधन बांधण्याची इच्छा व्यक्त केली.
असा घडला किस्सा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान भवनातील बैठक संपवून गाडीतून जात असताना अचानक विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड आणि गिरीष महाजन तिथे आले यावेळी मिलिंद नार्वेकर आणि या तिन्ही नेत्यांमध्ये गंमतीदार संवाद झाला. मिलिंद नार्वेकर यावेळी म्हणाले उद्धव साहेब, यांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे का? त्याचवेळी प्रविण दरेकर म्हणाले. आम्ही केव्हाही येऊ शकतो. दरेकरांचे हे वाक्य ऐकताच मिलिंद नार्वेकर म्हणाले यांना आताच गाडीत टाका, शिबबंधन बाधूया हे ऐकून दरेकर म्हणाले आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचे मूळ आहे. हे ऐकून सर्वांचा हशा पिकला.
प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बने युतीचे संकेत?
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लेटर बॉम्ब टाकून राज्यातील राजकारणात चर्चा घडवून आणली होती. त्यांनी तर आपल्या पत्रात युतीशी जुळवून घ्यायला हवे असे म्हटले होते. यावेळी लिहिलेल्या पत्रात प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे असे सरनाईक आपल्या पत्रात म्हणाले. त्याचबरोबर गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी भी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात. मात्र आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत" अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी "महाविकास आघाडी" स्थापन केली की काय ? अशी चर्चा असल्याचे देखील सरनाईक म्हणाले होते.
बावनकुळेचेही संकेत
प्रताप सरनाईकंच नाही, तर शिवसेनेचे 90 टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज आहेत. सरकारमध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचीच कामं होत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आपला पक्ष मजबूत करत आहेत, शिवसेना कमजोर होत आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि आमदार या सरकारवर नाराज आहेत. वीज कापल्याने शिवसेना आमदारांवर लोकांचा रोष कायम आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको असे आज सकाळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.