रत्नागिरी : जिल्हा सध्या चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे काही नियम आणि अटी पाळत जनजीवन सुरु आहे. दरम्यान, डेल्टा प्लॅस व्हेरियंटच्या रूग्णांची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ संख्या असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार का, कडक होणार? याबाबतच चर्चा सुरु झाली आहे. याचवेळी आता रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी आक्रमक झाले असून त्यांनी थेट जिल्हा परिषद सीईओ डॉक्टर इंदूराणी जाखड आणि तहसीलदारांची गाडी अडवत त्यांना जाब विचारला. तालुक्यातील माभळे, धामणी, नावडी आणि कसबा हा भाग कन्टेनमेंन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. परिणामी व्यापाऱ्यांना दुकानं देखील उघडता येत नाही. त्यामुळे मोठं संकट उभं आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे केले असता त्यांच्याकडून कोणतंही ठोस उत्तर येत नाही. कायम उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. अशा वेळी आम्ही करायचं तरी काय? असा सवाल यावेळी व्यापाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंना केला. तसेच ठोस निर्णय न घेतल्यास आम्ही गुरूवारपासून कोणत्याही परिस्थितीमध्ये दुकानं उघडणार. कारवाई केल्यास आम्ही एकमेकांच्या पाठिशी आहोत असा पवित्रा देखील यावेळी व्यापाऱ्यांनी घेतला आहे. त्यानंतर व्यापाऱ्यांचं निवेदन स्वीकारत, व्यापाऱ्यांची समजूत काढत जिल्हा परिषद सीईओ आपल्या पुढील कार्यक्रमासाठी पुढे मार्गस्थ झाल्या.
का आहे या भागात कन्टेनमेंन्ट झोन?
रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आलेले कोरोनाच्या डेल्टा प्लॅस व्हेरियंटचे रूग्ण हे संगमेश्वर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे या भागात कन्टेनमेंट झोनचा निर्णय घेण्यात आल्याचं बोलंल जात आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यात डेल्टा प्लॅस व्हेरियंटचे रूग्ण नसल्याचा दावा केला होता. पण, काहीच वेळात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नऊ रूग्ण रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे कुठं तरी समन्वयाचा अभाव आहे का? असा सवाल देखील केला जात आहे. दरम्यान, संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी मात्र नावडी भागात एकही करोनाचा रूग्ण नसताना अशा प्रकारे कन्टेनमेंट झोन का केला? असा सवाल केला आहे.
व्यापाऱ्यांचं म्हणणं काय?
लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या वेळी आम्ही खुप नुकसान सोसलं. पण, आता पावसाळा असल्यानं त्यांसंबंधित वस्तुंची विक्री होत त्यातून दोन पैसे मिळतील. आता या पुढे दुकानं बंद ठेवणे परवडणारे नाही. शिवाय, आमच्या बाजारपेठेला पुराचा धोका आहे. अशावेळी जास्त पाऊस झाल्यास आम्ही सामान कुठं आणि किती वेळात हलवणार? याचा विचार करावा. तसेच नाशवंत वस्तुंचं करायचं काय? जिल्ह्यातील इतर भागात दुपारी वाजेपर्यंत दुकानं सुरू आहेत. त्यानुसार नियम अटींनुसार दुकानं सुरू ठेवण्यास मुभा द्या. अन्यथा आम्ही गुरूवार अर्थात उद्यापासून दुकानं उघडणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. मागील कोरोना काळातील दीड वर्षाचा विचार करता रत्नागिरी जिल्ह्याध्ये व्यापारी अशा रितीनं आक्रमक झाल्याची हि पहिलीच घटना असावी.