मुंबई : महाराष्ट्राच्या दोन वटवाघुळांच्या प्रजातींमध्ये 'निपाह' हा विषाणू आढळून आला आहे. मार्च 2020 साली महाबळेश्वरच्या एका गुहेत ही वटवाघुळं आढळून आली होती. त्यांच्यामध्ये निपाह नावाचा विषाणू असल्याची माहिती मिळत आहे. 2018 साली केरळमध्ये निपाह विषाणूमुळे मृत्यूतांडव झालेलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या गुहेत आढळून आलेल्या वटवाघुळांमध्ये हा निपाह विषाणू असल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान, हा विषाणू कोरोनापेक्षाही भयावह आहे. 


महाराष्ट्रात पाहिल्यांदाच दोन वटवाघुळांच्या प्रजातींमध्ये निपाह वायरस आढळल्याचं पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजीकडून सांगण्यात आले आहे. मार्च 2020 मध्ये सातार्‍यातील महाबळेश्वर मधील गुहेमध्ये आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना एनआयव्हीच्या प्रमुख अभ्यासकर्ता डॉ. प्रग्या यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात वटवाघुळांमध्ये निपाह कधीच आढळला नव्हता.


भारतात यापूर्वी 2001मध्ये जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात पश्मिम बंगालमधील सिलिगुडी येथे निपाहचे 66 रूग्ण आढळले होते. त्यापैकी 45 रूग्णांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. 2007मध्ये एप्रिल महिन्यात पश्निम बंगालमधील नादिया येथे निपाहचे पाच रुग्ण आढळले होते. त्या पाचही रुग्णांचा मृत्यू झाला होता. 


जगभरात निपाह हा हा एक जीवघेणा विषाणू समजला जातो. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही त्याला दुजोरा देण्यात आला आहे. प्राण्यांमधून माणसामध्ये त्याचा प्रसार झाल्यानंतर तो अत्यंत जीवघेणा आजार असतो. त्यामुळे या आजाराबाबतही चिंता व्यक्त केली जाते. ‘Journal of Infection and Public Health’मध्ये सध्या एनआयव्ही चा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.


निपाह व्हायरसची लक्षणं 


ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, प्रकाशाची भीती वाटणे ही या आजाराची लक्षणं आहेत. यासारख्या लक्षणांवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सना विषाणूची माहिती नसल्यास त्यांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.