Nashik Leopard News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेत शिवारात बिबट्यांकडून (Leopard) होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नायगाव येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. मात्र यावेळी शेतकऱ्यांनी सावधगिरीचा पवित्रा घेत बिबट्याशी दोन हात करत झुंज दिली.  त्यानंतर मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक धावून आल्याने बिबट्याने तेथून ठोकली. 


नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यातील मळे परिसर असलेल्या भागात मानव बिबट संघर्ष वाढतच चालला आहे. दर दोन दिवसाआड बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. तर अनेक भागात बिबट्याचा वावर वाढला दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडू लागले आहे. अशातच सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये शेतकरी जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


गेल्या काही दिवसांपासुन बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे सोमनाथ वाबळे यांची शेती आहे. वाबळे हे शेतातील काम करून ते घरी परतत असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी बिबट्याने झेप घेत वाबळे यांच्या खांदा, गुडघा, पंजाला चावा घेतला. सोमनाथ यांनी बिबट्याला आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, पुढचे काही क्षण त्यांनी बिबट्याचा जोरदार प्रतिकारही केला. मात्र शक्ती कमी पडत असल्याचे पाहून त्यांनी आजूबाजूने नागरिकांना आवाज देत मदतीसाठी बोलवले. परिसरातील नागरिकांनी आवाज ऐकत धाव घेतली. त्यावेळी बिबट्याने धूम ठोकली. जखमी सोमनाथ त्यांना नागरिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले वनविभागाच्या पथकाने ही घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 


गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील नाशिक पश्चिम पट्टा असेल निफाड (Niphad) असेल या भागात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याचे जनावरांवर होण्याऱ्या हल्ल्यात वाढ झाली आहे. दरम्यान सिन्नर नायगाव परिसरात झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच याच दिवशी निफाड तालुक्यातील शिंगवे येथील माळवाडी परिसरात निलेश मोगल या शेतकऱ्यास बिबट्याचे दर्शन झाले. ही सगळी घटना या शेतकऱ्याने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. तर त्र्यंबक तालुक्यात देखील धूमोडी, गणेशगाव, विनायक नगर या गावांच्या परिसरात बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ले केले जात असल्याने शेतकरी भयभीत झाल्या आहेत. बिबट्याने हल्ला केलेल्या व्यक्तीला आर्थिक मदत व्हावी यासाठी शासकीय नियमानुसार वरिष्ठांकडे प्रस्ताव देणार आहे बिबट्याचे स्वतःसाठी कर्मचाऱ्यांच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांनी दिली आहे


अनेक पिंजरे मात्र बिबट्या पसारच 
अलीकडे त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील येथे आठ वर्षाच्या बालिकेचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर वन विभागाने बिबट्याला जाळ्यात अडकवण्यासाठी अनेक ठिकाणी पिंजरे लावले आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या मते या परिसरात केवळ एकच नव्हे तर चार ते पाच बिबट्या असण्याची शक्यता आहे. बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ले करण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी विनायक नगर येथील नथू उदार यांची बकरी, गणेशगाव येथील गुलाब महाले यांच्या दोन बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला होता. तर गुलाब महाले यांचा मुलगा हा बिबट्यापासून जीव वाचावा म्हणून पळताना जखमी झाला होता. त्यामुळे सदर परिसरात भीतीचे वातावरण आहे.