मुंबई : राजकीय धक्क्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray  ) यांना शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकीय धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या बदल्या शिंदे-फडणवीस  सरकारकडून रोखण्यात आल्या आहेत. ठाकरे सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटमधील तीन बदल्यांना शिंदे- फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. 


ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये तीन बदल्या केल्या होत्या. या बदल्या ठाकरे सरकारला अनुकूल होत्या. परंतु, सरकार बदलल्यानंतर या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. सध्या या सर्व ठिकाणी जैसे थे स्थिती आहे. 


सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची औरंगाबाद महानगरपालिकेत आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. तर सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुंडे यांची बदली करण्यात आली होती. याबरोबरच औरंगाबादचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांची सिडकोमध्ये दीपा मुंडे यांच्या जागी बदली करण्यात आली होती. या सर्व बदल्या शिंदे- फडणवीस सरकारने रोखल्या आहेत. 


29 जून रोजी ठाकरे सरकारची शेवटी कॅबिनेट बैठक झाली होती. या बैठकीत डॉ. अभिजीत चौधरी, दीपा मुंडे आणि अस्तिक कुमार पांडे यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. याच मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. 


कायद्याप्रमाणे जून अखेर प्रशासकीय बदल्या होणे अपेक्षित असते. परंतु, अजूनही अनेक प्रशासकीय बदल्या रखडलेल्या आहेत. शिवाय ज्या बदल्या झाल्या आहेत त्यांच्याबाबत देखील आता संदिग्धता निर्माण झाली आहे.  


दरम्यान, फक्त बदल्या रोखण्यावरच न थांबता शिंदे-फडणवीस सरकारकडून ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना देखील स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सरकार आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या


IPS Transfer : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा यादी


IAS टीना दाबी जैसलमेरच्या नव्या जिल्हाधिकारी, IAS प्रदीप गवांडे यांचीही बदली; राजस्थान सरकारकडून 29 अधिकाऱ्यांच्या बदल्या