Maharashtra IPS Transfer : राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस उपायुक्त, अपर पोलीस अधीक्षक दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सचिव व्यंकेश भट यांनी बुधवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. गृह विभागाने आज राज्यातील पोलिस उपमहानिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून राजेंद्र माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र माने हे सध्या मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. हरीश बैजल हे सोलापूर पोलीस आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाने गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला होता.
सुधीर हिरेमठ यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारताच शहरातील अवैध धंदे विरोधात कारवाई आणि वाहतूक शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र आज गृह विभागाने राज्यातील पोलीस उपमहानिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. यात सोलापूरचे पोलिस आयुक्त म्हणून राजेंद्र माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र माने यांनी यापूर्वी देखील सोलापुरात कर्तव्य बजावले आहे. भूषणकुमार उपाध्याय हे सोलापूरचे पोलीस आयुक्त असताना राजेंद्र माने हे परिमंडळ विभागाचे उपायुक्त होते.
या अधिकाऱ्यांच्या बदल्या
IPS राजेंद्र माने (पोलिस आयुक्त, सोलापूर)
IPS पंजाबराव उगले (अतिरिक्त पोलिस आयुक्त वेस्ट रीजन) ठाणे पोलिस
IPS दत्तात्रेय शिंदे (अतिरिक्त पोलिस आयुक्त ईस्ट रीजन)ठाणे पोलिस
IPS अक्षय शिंदे (जिल्हा पोलिस अधीक्षक जालना)
IPS अतुल कुलकर्णी (जिल्हा पोलिस अधीक्षक उस्मानाबाद)
IPS नंदकुमार ठाकूर (जिल्हा पोलिस अधीक्षक बीड)
बाळासाहेब पाटील (जिल्हा पोलिस अधीक्षक पालघर)
IPS महेश पाटील (अतिरिक्त पोलिस आयुक्त वाहतूक) मुंबई पोलिस
IPS संजय जाधव (अतिरिक्त पोलिस आयुक्त अॅडमिन) ठाणे पोलिस
बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती
बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकूर हे यापूर्वी नांदेड येथे पोलीस अधीक्षक पदी कार्यरत होते.
बीडचे माजी पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या विरोधात जिल्ह्यातील जवळपास सर्व आमदारांनी तक्रारी केल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते व नंतर बदली करण्यात आली. त्यानंतर पंकज देशमुख यांची प्रभारी अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, बीड सारख्या संवेदनशील जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधीक्षक असणे गरजेचे होते. अखेर, आज बुधवारी बीड पोलीस अधीक्षकपदी नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. बीड जिल्ह्यात सुरू असणारे गंभीर गुन्ह्यांचे सत्र रोखण्याचे मोठे आव्हान नूतन पोलीस अधिक्षकांसमोर असणार आहे.