Maharashtra Chief Secretary Mumbai : राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर (Dr. Nitin Karir) यांचा कार्यकाळ आज 30 जून रोजी संपणार आहे. मात्र, त्या पदावर पुढे नेमकं कुणाची वर्णी लागणार याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. याच वेळी राज्याच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्यास मुख्य सचिवपदी संधी देण्याचा सरकारचा मानस असल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांची वर्णी लागण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवविण्यात येत आहे. सेवा जेष्ठतेनुसार सुजाता सौनिक यांच्या नावाची चर्चा आहे.
सुजाता सौनिक या सध्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. त्या 1987 च्या आयएएस अधिकारी आहेत. सेवा जेष्ठतेनुसार सौनिक यांचाच क्रमांक पहिला लागतो. त्यामुळे मुख्य सचिव पदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरणार आहेत.
कोण आहेत सुजाता सौनिक?
सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहे. सुजाता सौनिक या मुख्य सचिव झाल्यास पती आणि पत्नी मुख्य सचिव झाल्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगड मध्ये झाले आहे. पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतलीय. त्यानंतर त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृहमंत्रालय, सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदावर देखील कारभार सांभाळला आहे. शिवाय त्या गेल्या तीन दशकांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.
सुजाता सौनिक ठरणार राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव?
राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांचा कार्यकाळ आज 30 जून रोजी संपतो आहे. त्यानुसार काल रात्री उशिरापर्यंत या पदासाठी नाव घोषित होणे अपेक्षित होतं. तसेच डॉ. नितीन करीर यांना अतिरिक्त कार्यकाळ मिळू शकतो का, याबाबत माहिती घेतली असता ही शक्यता जवळजवळ मावळली आहे. परिणामी मुख्य सचिव पदासाठी अन्य कुणाला कारभार सोपवण्यात येणार आहे. सेवाज्येष्ठतेनुसार (1987च्या तुकडीतील गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (1988) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (1989) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात आहेत.
सुजाता सौनिक, राजेश कुमार आणि इकबाल सिंह चहल या तीन नावांचीच चर्चा सध्या सुरू असून सेवा जेष्ठतेनुसार सुजाता सौनिक यांच्या नावाची वर्णी लागण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुजाता सौनिक यांची वर्णी लागल्यास त्या राज्याच्या पहिला महिला मुख्यसचिव बनण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या