नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात रविवारी झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आज सकाळी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या पॉलिटिकल नाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळणार आहे. कारण सुप्रीम कोर्टानं महाधिवक्ते तुषार मेहता यांना सरकार स्थापनेबाबतची महत्त्वाची कागदपत्रं आज सकाळी 10.30 वाजता कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


सुप्रीम कोर्टानं महाधिवक्त्यांना राज्यपालांनी भाजपला सरकार बनवण्यासाठी निमंत्रित केलेलं पत्र आणि फडणवीस यांनी दिलेलं त्यांच्याकडील बहुमताचा दावा करणारं पत्र आजच्या सुनावणीपूर्वी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तातडीनं विधीमंडळात बहुमत सादर करण्याची विरोधकांची मागणी कोर्टाने मान्य केलेली नाही.

केंद्र सरकार, राज्य सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना नोटीस

सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात केंद्र सरकार, राज्य सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही नोटीस जारी केली आहे. न्यायमूर्ती एन.व्ही.रमण्णा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादीच्या बाजूने ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी आणि शिवसेनेकडून ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर मुकुल रोहतगी यांनी भाजप आमदार आणि अपक्षांकडून खिंड लढवली.

पाहा व्हिडीओ : सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी होणार | नवी दिल्ली 



एनसीपी आणि शिवसेना आमदार नजरकैदेत

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्व पक्षांनी आपल्या आमदारांना नजरकैदेत ठेवलं आहे. एकीकडे भाजप आपलं बहुमत सिद्ध करण्याचा दावा करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या आमदारांना नजरकैदेत ठेवलं आहे. एवढच नाहीतर भाजपने आपलं ऑपरेशन लोटस सुरु केलं आहे. ऑपरेशन लोटसमध्ये चार नेत्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या सोपावल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटिल, गणेश नाईक, नारायण राणे आणि बबन पाचपुते यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. खास गोष्ट म्हणजे, हे चारही नेते पक्षांतर करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले आहेत.

अजित पवारांकडं 27 आमदारांचं पाठबळ; बदल्यात 12 मंत्रिपदं अन् 15 महामंडळं?

जयंत पाटलांचं अजित पवारांना आवाहन 

भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांनी काल एक ट्वीट केले होते. त्यात "मी राष्ट्रवादीमध्ये आहे, आणि कायम राष्ट्रवादीसोबत राहीन. शरद पवार साहेबच आमचे नेते आहेत, असं ते म्हणाले होते. या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भावनिक आवाहन केलं आहे. "आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहात. आदरणीय पवार साहेबांच्या सावलीत आपण सगळेच वाढलो आहोत. मात्र, राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे. साहेबांच्या या निर्णयाचा आदर ठेवून आपण परत या, असे जयंत पाटील म्हणाले.

पाहा व्हिडीओ : सत्तास्थापनेच्या याचिकेसंदर्भात सुप्रीम कोर्टात काल नक्की काय झालं? 



भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - शरद पवार

मी राष्ट्रवादीतच आहे आणि कायम राहणार. शरद पवारच आमचे नेते आहेत. पुढील पाच वर्षासाठी राष्ट्रवादी आणि भाजप हे महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकेल, असं अजित पवारांनी ट्वीट केलं होतं. यावर भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आघाडीसोबत सत्तास्थापन करणार आहे. अजित पवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे, असे उत्तर शरद पवार यांनी अजित पवारांच्या ट्वीटला दिलं आहे.