Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार असून सकाळी 11 वाजता राजभवन या ठिकाणी 18 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिंदे (Eknath Shinde) गटाचे सात मंत्री तर भाजपकडून (BJP) 11 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता असून आत्तापर्यंत 9 नावांवर भाजपकडून शिक्कामोर्बत झाल्याची माहिती आहे. उर्वरित दोघांमध्ये एक महिला आमदार शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यसह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.
शिंदे गटाच्या सात जणांची यादी तयार, मंत्रिपदासाठी अनेकांची जोरदार फिल्डिंग
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर शिंदे सरकारला मुहूर्त सापडला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नंदनवन येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात काही तास चर्चा झाली. शिंदे गटामध्ये मंत्रीपदासाठी जोरदार चुरस असल्याचं दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या शपथविधीसाठी शिंदे गटाच्या सात जणांची यादी तयार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाकडे आहे. यामध्ये उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांचे नाव असल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून हे मंत्री आज शपथ घेणार आहेत. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपच्या मंत्र्यांची यादी ठरली असून टप्प्याटप्प्याने त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे.
शिंदे गटाकडून हे मंत्री शपथ घेतील
1) उदय सामंत
2) दादा भुसे
3) संजय शिरसाठ
4) संदीपान भुमरे
5) गुलाबराव पाटील
6) भरत गोगावले
7) शंभूराज देसाई
भाजपकडून हे मंत्री शपथ घेतील
1) चंद्रकांत दादा पाटील
2) राधा कृष्ण विखे पाटील
3) सुधीर मुनंगटीवार
4) गिरिष महाजन
5) सुरेश खाडे, मिरज
6) अतुल सावे
7) मंगल प्रभात लोढा
8) रवींद्र चव्हाण
9) विजयकुमार गावित
राज्याचे विधीमंडळाचे अधिवेशन 10 ऑगस्टपासून
राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाला (Maharashtra Assembly Session) बुधवार, 10 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. विधीमंडळ सचिवालयाकडून याबाबत परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाकरीता मंगळवार, 9 ऑगस्ट, 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे कार्यालय सुरु राहील. तसेच मंगळवार 9 ऑगस्ट ते गुरुवार, 18 ऑगस्ट, 2022 या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या
Maharashtra Cabinet Expansion : शिंदे गटाचं ठरलं; उदय सामंत, दादा भूसे, गुलाबराव पाटील यांच्यासह हे सात मंत्री शपथ घेणार, सत्तारांचा पत्ता कट?