मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


शिंदे-फडणवीस सरकारचा आज शपथविधी


राज्य मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार असून सकाळी 11 वाजता राजभवन या ठिकाणी 18 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिंदे गटाचे सात मंत्री तर भाजपकडून 11 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


शिंदे गटाकडून हे मंत्री शपथ घेतील
1) उदय सामंत
2) दादा भुसे
3) संजय शिरसाठ
4) संदीपान भुमरे
5) गुलाबराव पाटील
6) भरत गोगावले 
7) शंभूराज देसाई


भाजपकडून उद्या 11 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता असून आत्तापर्यंत 9 नावांवर भाजपकडून शिक्कामोर्बत झाल्याची माहिती आहे. उर्वरित दोघांमध्ये एक महिला आमदार शपथ घेणार असल्याची शक्यता आहे.  


भाजपकडून हे मंत्री शपथ घेतील
1) चंद्रकांत दादा पाटील
2) राधा कृष्ण विखे पाटील
3) सुधीर मुनंगटीवार
4) गिरिष महाजन
5) सुरेश खाडे, मिरज
6) अतुल सावे
7) मंगल प्रभात लोढा 
8) रवींद्र चव्हाण
9) विजयकुमार गावित


बिहारमध्ये राजकीय भूकंप? नितीश कुमार यांनी बोलावली आमदारांची बैठक
जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी शनिवारी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरून भाजप आणि जेडीयूच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरु आहेत. यामुळेच बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटण्याची चिन्हे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या घरी आज बैठक बोलावली आहे. आज सकाळी 11 वाजता ही बैठक होणार असून बिहारमधील जेडीयू आणि भाजपच्या युतीवर त्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. 


जेडीयूची भूमिका पाहता भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे. भाजपच्या जवळच्या सूत्रांनी असं सांगितलं आहे की, भाजप सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भाजपकडून नितीश कुमार यांचा पक्ष फोडण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही. तसेच भाजप आपल्या बाजूने सरकार पाडण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणार नाही असं भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.


राज्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊसाची शक्यता
महाराष्ट्रात 11 ऑगस्टपर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पुढील तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत डिप्रेशनमध्ये रुपांतरीत होणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चांगल्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाची चिन्ह आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपुरात काही ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गडचिरोलीत एक-दोन ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे, अशी माहिती नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिली.


कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.