Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आणि एकापाठोपाठ एक आमदार, खासदार एवढंच नाहीतर नगरसेवकही शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेत पडलेली उभी फूट हा संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला. ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक असलेले अनेकांनी शिंदेंना पाठिंबा दिला. काल ठाकरेंची बाजू मांडणारे आणि शिंदे गटात गेलेल्यांना परत येण्याचं आवाहन करणाऱ्यांपैकी अनेकजण स्वतःच शिंदे गटात सामील झाले. यातील एक नाव म्हणजे, उदय सामंत (Uday Samant), ठाकरे सरकारमधील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री. 


शिंदे गट बाहेर पडला, आणि राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच उदय सामंतांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार हे निश्चित मानलं जात होतं. त्यानुसार, आज त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. खरंतर उदय सामंत यांनी राष्ट्रवादी पक्षातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पण त्यानंतर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. 


उदय सामंत यांचा परिचय 


उदय सामंत यांचा जन्म यांचा 26 डिसेंबर 1975 रोजी झाला. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते सलग चार वेळा निवडून आले. त्यांनी आपलं शालेय शिक्षण महाराष्ट्र बोर्डातून पूर्ण केलं. तर पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून त्यांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरींग डिप्लोमा पूर्ण केला. त्यांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील शांती सदन, पाली हे आहे. उदय सामंत यांच्या राजकीय कारकीर्दीबाबत बोलायचं झालं तर ते रत्नागिरीतील प्रबळ राजकारण्यांपैकी एक आहेत. कोकणातलं मुख्य ठाणं असलेल्या रत्नागिरीत त्यांचं वर्चस्व पाहायला मिळतं. तसेच, उदय सामंत यांच्याबाबत बोलायचं झालंच, तर राजकीय टीकाटिपणी करताना वादापासून कायमच दूर असतात. एवढंच नाहीतर राज्याच्या राजकारणात विरोधकांशी सख्य असलेले फारच कमी नेते पाहायला मिळतात, उदय सामंत हेदेखील त्यापैकी एक. त्यांच्या याच गुणांमुळे त्यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान दिल्याचं बोललं जात आहे. 


राजकीय कारकीर्द


2004 : महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले (पहिली टर्म)
2009 : महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (दुसरी टर्म)
2013-2014 : महाराष्ट्र सरकारमधील नगरविकास राज्यमंत्री 
2013 - 2014 : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री
2014 : महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (तिसरी टर्म)
2017 : पुणे शहराचे संपर्कप्रमुख नियुक्त 
2018 : शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी 
2018 : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती 
2019 : महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (चौथी टर्म) 
2019 : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नियुक्त
2020 : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्त


'किंगमेकर'मुळे गणित बदलणार?
 
उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आले. पण, त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांना मानणारा वर्ग देखील रत्नागिरी-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात आहे. उदय सामंत आमदार असले तरी त्यांचे वडिल आणि भाऊ यांचं मतदारसंघावर लक्ष असतं. कार्यकर्त्यांशी ते स्वत: संवाद साधत असतात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतात. सामंत यांचे बंधू उद्योजक किरण सामंतांना किंगमेकर म्हणून ओळखलं जातं. अशातच सामंत शिंदे गटात गेल्यानंतर अनेक शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधत एल्गार पुकारला आहेत. पण मतदारसंघावरची त्यांची पकड पाहता, या विरोधाचा फारसा फरक सामंतांना पडणार नाही, असं दिसतंय. शिवाय, किंगमेकर' म्हणून ओळखले जाणारे किरण सामंत देखील पडद्यामागून सर्व सुत्र हलवण्यात माहीर असून त्यांच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


ठाकरे सरकारच्या काळात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असण्यासोबतच ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. पण रत्नागिरी जिल्ह्यातील पालकमंत्री अनिल परब यांच्या अनुपस्थितीत उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात दौरे करून हा जिल्हाही सांभाळला होता. त्यामुळे सामंत यांचा संपर्क या दोन्ही जिल्ह्यांत ऊत्तम आहे. त्यांनी आठ वर्षांपूर्वी निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी दाखल केली होती. निवडणुकीत त्यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ त्यांनी एकहाती आपल्याकडे ठेवला आहे. सामंत यांच्यासाठी हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आजही सेफ मानला जातो. उदय सामंत ठाकरे सरकारमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री होते. शिंदे-फडणवीस सरकारमध्येही त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता त्यांच्या भक्कम खांद्यांवर सरकारमध्ये कोणती जबाबदारी दिली जाते, याची उत्सुकता अनेकांना आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही सामंत यांच्याकडेच येण्याची शक्यता आहे.