Maharashtra Cabinet Expansion : मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे (Minister Dada Bhuse) हे ठाकरे सरकारच्या (Thkackeray Goverment) काळात कृषिमंत्री म्हणून कारभार पाहत होते. काही दिवसांपूर्वी राज्यात विलक्षण घडामोडी घडल्या. शिवसेनेचे एकनिष्ठ नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बाहेर पडत वेगळी वाट चोखळली. शिंदे यांच्यासोबत 40 आमदार देखील होते.  यात अनेक वर्षांपासून मैत्री जपणारे दादा भुसे देखील सामील होते. शिंदे गट बाहेर पडला, आणि राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच पुन्हा एकदा दादा भुसेंना लाल दिवा मिळणार हे फिक्स होते. आता नव्याने झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दादा भुसे यांना मंत्रीपद मिळाले असून यासोबतच भुसे हे नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत देखील आघाडीवर आहेत. 



दादा भुसेंचा परिचय
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात दादाजी दगडू भुसे यांचा जन्म 6 मार्च 1964 ला झाला. त्यांचे प्राथमिक सह माध्यमिक शिक्षण हे मालेगाव शहरात झाले. पुढे त्यांनी डिसीए पर्यत शिक्षण घेतले. मालेगाव बाह्य हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ असून ते सलग चार वेळा येथुन निवडुन आले आहेत. 


काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिकाची एन्ट्री
मालेगाव तालुका हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या शहरासह तालुक्यात काँग्रेसह समाजवादी पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे येथे सत्ता बदल होणे फार कठीण होते. त्यावेळी सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले दादा भुसे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री मारली. छोटे मोठे आंदोलन, तोंडात साखर ठेवून तळागाळापर्यंत शिवसेना पोहचवण्यास सुरवात केली. हळूहळू स्थानिक तरुण शिवसेनेकडे आणि आपसूक दादा भुसे यांच्याकडे आकर्षित झाला. तरुण आकर्षित होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ग्रामीण भागात शिवसेनेच्या शाखा उदघाटनाचा धडाका सुरू केला. या माध्यमातून ते तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले. शिवसैनिक ते तालुकाप्रमुख अशी मजलही त्यांनी मारली. भुसे यांच्या घरात राजकीय वारसा नसतांना देखील त्यांनी आपल्या हिंमतीवर राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले


मालेगावात हिरे घराण्याच प्रस्थ 
मालेगाव शहरात त्यावेळी  सहकारमहर्षी भाऊसाहेब हिरे यांच वर्चस्व होतं. हिरे घराण्याची परंपरा राखण्याचे काम कुटुंबातील इतर सदस्यांनी केले. मात्र त्यानंतर दादा भुसे यांनी हिरे कुटुंबियांना आव्हान दिले. मात्र हे आव्हान पहिल्याच निवडणुकीत हिरे कुटुंबीयांनी हाणून पाडले. दादा भुसे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. पराभव जिव्हारी लागल्याने दादा भुसे मागे वळुन न पाहता आपले काम सुरू ठेवले. दरम्यान 2004 मध्ये दादा भुसे यांनी प्रस्थापित हिरे घराण्याचा 0पराभूत केले. आणि मालेगाव मध्ये भगवा फडकवला. त्यानंतर दादा भुसे यांनी सलग चार वेळा मालेगाव बाह्य मतदारसंघात दणदणती विजय मिळवला. विशेष म्हणजे गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते ग्रामविकास राज्यमंत्री होते, तर ठाकरे सरकारमध्ये त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. तर आता शिंदे सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळाल्याने सामान्यांना न्याय देण्याची त्यांना संधी मिळाली आहे.


राजकारणी, समाजकारणी कुटुंब
दादा भुसे यांच्या कुटुंबात राजकीय वारसा नव्हता. मात्र भुसे यांनी आतापर्यंत च्या कारकिर्दीत भुसे घराण्याच प्रस्थ निर्माण केले. सध्या त्यांची पत्नी अनिता या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तर त्यांचे चिरंजीव अजिंक्य आणि अविष्कार हे युवासेनेत सक्रिय आहेत. अविष्कार तर युवा सेनेचे राज्य संघटक आहेत. त्यामुळे राजकारण आणि समाजकारणाला वाहून घेतलेलं कुटुंब म्हणूनही भुसे यांच्या कुटुंबाकडे पाहिलं जाते. 


बेधडक, न्यायप्रविष्ट, सामान्य माणसाची जाण असणारा नेता...
दादा भुसे हे मालेगावच्या शेतकरी कुटुंबातून पुढे आले. फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री पद भूषविले. त्यानंतरच्या ठाकरे सरकारच्या काळात थेट कृषीमंत्रीपदापर्यंत मजल मारली. तर शिंदे गट स्थापन झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पाठीशी उभे राहिले. ठाकरे सरकारच्या कृषिमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापारी, विक्रेत्यांचे पितळ उघडे पाडले. अनेकदा वेषांतर करून ग्राहक बनून खतांच्या दुकानात जाऊन स्टिंग ऑपरेशन देखील केले आहे.  तर एकदा मुंबईत कृषी च्या कार्यक्रमानिमित्त जात असताना रस्ते मार्गाने न जाता थेट लोकलचा प्रवास करून सर्वांनाच आश्चर्य चकित केले होते. आणि आता पुन्हा एकदा मंत्रीपद मिळाल्याने दादा भुसेंचा बेधडकपणा पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे.