Maharashtra Cabinet Reshuffle:  मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या खातेवाटपाचा तिढा (Cabinet Reshuffle)अखेर आज सुटला. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणती खाती जाणार याकडे लक्ष लागले होते. मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होण्याआधी खातेवाटप जाहीर झाले आहे. मात्र, या खातेवाटपात आधी सहभागी असलेल्या कोणत्याही मंत्र्याला मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला नाही. मात्र, काही मंत्र्यांकडील भार कमी करण्यात आला आहे. 


मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू असताना शिंदे गटातील पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची चर्चा सुरू होती. या पाच मंत्र्यांमध्ये रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre), कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant), पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulab Patil), अन्न वं औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा समावेश असल्याचे म्हटले जात होते. 


शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या कार्यपद्धतीवर आणि खात्यात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी  समोर आल्या होत्या. संजय राठोड यांच्याकडे  अन्न आणि औषध प्रशासन खात्याची जबाबदारी होती. संजय राठोड यांच्याविरोधात केमिस्ट संघटनांमध्ये नाराजी होती. ही नाराजी दिल्ली दरबारी पोहचली असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर राठोड यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली असल्याचे समोर आले होते.


अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. सत्तार यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्यात आले होते. आता, सत्तार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे सत्तार यांचे मंत्रिपद धोक्यात आले असल्याची चर्चा होती. 


मात्र, आज झालेल्या खातेवाटपात या मंत्र्यांना अभय मिळाले असल्याची चित्र आहे. संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण खातं देण्यात आले आहे. अन्न आणि औषध प्रशासन खाते काढण्यात आले आहे. हे खाते धर्मरावबाबा आत्रम यांच्याकडे देण्यात आले आहे.  तर, अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खाते हे  अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर, सत्तार यांच्याकडे अल्पसंख्याक विकास आणि वक्फ बोर्ड, पणन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 


दरम्यान, आज जाहीर झालेल्या खातेवाटपात भाजपच्या मंत्र्यांकडे असणारी 6 आणि शिवसेना शिंदे गटाकडे असलेली 3 खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील मंत्र्यांना मिळाली आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेतून बंड करताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील बंडखोर आमदारांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवार हे निधी वाटपात पक्षपातीपणा करत असून शिवसेनेच्या आमदारांना दुजाभाव देत असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडील खात्यांना सर्वाधिक निधी जात असल्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होेते. 


इतर संबंधित बातमी: