Maharashtra Cabinet:  जवळपास आठवडाभराच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर आज राज्याच्या नवीन मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी (NCP ministers) मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांना कोणती मिळणार याकडे लक्ष लागले होते. 

आज जाहीर झालेल्या खातेवाटपात भाजपच्या मंत्र्यांकडे असणारी 6 आणि शिवसेना शिंदे गटाकडे असलेली 3 खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील मंत्र्यांना मिळाली आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेतून बंड करताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील बंडखोर आमदारांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवार हे निधी वाटपात पक्षपातीपणा करत असून शिवसेनेच्या आमदारांना दुजाभाव देत असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडील खात्यांना सर्वाधिक निधी जात असल्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होेते. 

राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणाची खाती 

खाते  नवीन पदभार कोणत्या मंत्र्याकडे? आधी कोणाकडे पदभार होता? कोणत्या पक्षाकडे होतं खातं?
अर्थ अजित पवार  देवेंद्र फडणवीस भाजप
कृषी  धनंजय मुंडे अब्दुल सत्तार शिवसेना 
सहकार दिलीप वळसे पाटील  अतुल सावे भाजप
वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ गिरीश महाजन भाजप 
अन्न नागरी पुरवठा छगन भुजबळ रविंद्र चव्हाण भाजप
अन्न आणि औषध प्रशासन धर्मराव अत्राम  संजय राठोड शिवसेना
क्रीडा आणि युवक कल्याण संजय बनसोडे गिरीश महाजन भाजप
महिला आणि बालकल्याण अदिती तटकरे मंगलप्रभात लोढा भाजप
मदत आणि पुनवर्सन अनिल पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  शिवसेना 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मागील काही दिवस खातेवाटपावर चर्चा होती. खातेवाटपाच्या चर्चेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत चर्चा केली होती. अखेर खातेवाटपाच्या बऱ्याच बैठकानंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झालं आहे.  

अजित पवारांची बंडखोरी, सरकारला पाठिंबा

2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप घडवलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवार हे काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. 

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तरदिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ,धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, अनिल भाईदास पाटील, अदिती तटकरे आणि संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार याची चर्चा रंगली होती.