Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session 2023) आजपासून शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. आजही विरोधक शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांवरुन आक्रमक झाल्याचे पाहयला मिळालं. कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शनं केली. मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) येताच विरोधकांनी 'खोक्यांची पीडा टळू दे बळीच राज्य येऊ दे', 'ईडी पीडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे' अशी घोषणाबाजी केली.
गारपीठग्रस्तांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा
आंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळालाच पाहिजे. गारपीठग्रस्तांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. ईडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे, ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे... अशा गगनभेदी घोषणा दिल्या. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तात्काळ मदत करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
कांदा, द्राक्ष घेऊन विरोधक सभागृहात दाखल
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा चौदावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन विधानभवनात प्रवेश केला. पायर्यांवर ठाण मांडत जोरदार निदर्शने केली. दरम्यान, विधानसभेचं कामकाज सुरु झालं आहे. विधानभवनात देखील विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आवाज उठवला आहे. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष, आंबा, केळी, भाजीपाला पिकांचं मोठं नकुसान झालं आहे. यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.
Budget Session : अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून चौथा आणि शेवटचा आठवडा सुरु होत आहे. आजही अनेक मुद्यांवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती आज चर्चा होणार आहे. तसेच अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्यावरुन तसेच जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या दोन्ही मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :