मुंबई : राज्यभरातील वेगवेगळ्या विभागातील शासकीय कर्मचारी (Maharashtra Government Staff Strike) जुन्या पेन्शनच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी संपावर गेले असून, आज या संपाचा सातवा दिवस आहे. या मागणीसाठी संपकरी कर्मचाऱ्यांनी कामबंदची हाक दिली आहे. दरम्यान  राजपत्रित अधिकारी संघटनेबरोबर आज सरकारची  या संदर्भात चर्चा होणार आहे.  दुपारी बारा वाजता मुख्य सचिवांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  या  बैठकीत तोडगा न निघाल्यास राजपत्रित अधिकारी संघटनेने तोडगा न निघाल्यास 28 मार्चपासून संपात सहभागी होण्याचा इशारा  दिला आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक सल्लागार ग. दि. कुलथे यांनी 'एबीपी माझा'ला माहिती ही माहिती दिली आहे.


जोपर्यंत सरकार जुन्या निवृत्तिवेतन योजनेविषयी काही निर्णय घेत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार आहे. अशी भूमिका सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज मुख्य सचिव श्रीवास्तव दुपारी 12 वाजता चर्चा करणार आहेत. सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे राजपत्रित अधिकारी महासंघ 28 मार्चपासून संपात सहभागी होणार असल्याचे घोषित केले आहे. संपामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय होते तर सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झालयं. तर दुसरीकडे दहावी बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत जरी सुरू असल्या तरी पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने दहावी आणि बारावी बोर्डाचा निकालास विलंब होऊ शकतो. 


राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने  राज्यव्यापी संप आंदोलन सुरू केले आहे. आज या संपाचा सातवा दिवस आहे या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांकडून संप काळात विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत


20 मार्च : थाळी नाद


सर्व जिल्हा कर्मचारी कार्यालयासमोर ,शाळेसमोर दुपारी 12 ते साडे 12 या वेळात गगनभेदी थाळी नाद करून राज्य सरकारच्या नकारात्मक भूमिकेचा धिक्कार करणार आहेत


23 मार्च : काळा दिवस


या दिवशी जिल्हानिहाय कर्मचारी शिक्षक काळे झेंडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार आहे.  घोषणांच्या निनादात निदर्शने करण्यात येणार आहे.


24 मार्च : माझे कुटुंब माझी पेन्शन अभियान 


या दिवशी जिल्हा न्याय कर्मचारी शिक्षक कुटुंबासहित जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन निषेध व्यक्त करणार आहेत


रुग्णालये कोलमडली, प्रशासकीय काम खोळंबले, शेतीचे पंचनामे रखडले


सरकारी कर्माचाऱ्यांचा संप सुरू होऊन सात दिवस झाले तरी सरकारने अद्याप संपाची दखल घेतलेली नाही. या संपामुळे राज्यात अनेक ठिकाणी प्रशासकीय कामं खोळंबली आहेत. तर कुठे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकार या संपावर कधी तोडगा काढणार याकडे लक्ष लागलंय. यावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत.