Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) नामांतराच्या समर्थनात रविवारी (19 मार्च) रोजी शहरात हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला होता. मात्र मोर्चा संपल्यावर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी औरंगाबाद नाव असलेल्या फलकांची तोडफोड करण्यात आली आहे. तर एका बँकेच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, याचवेळी शहरातील सिडको एन-1 मधील पिरॅमिड चौकातील आय लव्ह औरंगाबादचा डिजिटल बोर्ड भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून फोडण्यात आला आहे. भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांकडून ही तोडफोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अनुराधा चव्हाण यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.  


छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) काढण्यात आलेल्या मोर्च्यानंतर रविवारी हुल्लडबाजी पाहायला मिळाली. परंतु मोर्चा संपल्यावर परतताना काही हुल्लडबाज तरुणांनी रस्त्यावर असलेले औरंगाबाद नावाचे होर्डिंग फाडले. तसेच महानगरपालिकेच्या सिटी बसवर दगड मारून काचाही फोडण्यात आल्या आहेत. तसेच एका शौचालयावर असलेल्या बोर्डची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे...



  • पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील मोर्चा काढल्याने पोलिसांनी 12  आयोजकांवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तर यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी तेलंगणाचे आ. राजासिंह ठाकूर ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • उस्मानपुरा परिसरातील महानगरपालीकेच्या मालकीच्या भिंतीला लावण्यात आलेल्या लोखंडी पत्र्याच्या पाटीवरील औरंगाबाद नाव तोडून आणि लोखंडी पाटी तोडून टाकून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच पोलीस आयुक्तांच्या  जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रोनक आशिष मालु (वय 18 वर्ष, धंदा शिक्षण, रा. अयप्पा मंदीर जवळ, छत्रपतीनगर, बीड बायपास) दिपक नकुल कुमावत (वय 21 वर्षे, धंदा खा. नोकरी, रा. साईनाथनगर, छत्रपतीनगर, बीड बायपास) नकुल नरहरी चौधरी (वय 18 वर्ष, धंदा खा. नोकरी, रा. बोरी, ता. जिंतुर, जि. परभणी) जनक वैभव मालु (वय 18 वर्ष, धंदाशिक्षण, रा. अयप्पा मंदीर जवळ) यांच्यासह इतर 4 ते 5  अज्ञात व्यक्तीविरुद्ध उस्मानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • एन-1  मधील सिडको चौकात स्मार्ट सीटीच्या अंतर्गत लावण्यात आलेला 'लव औरंगाबाद'  नावाच्या बोर्डची तोडफोड करून सार्वजनीक मालमत्तेचे जाणीवपूर्वक नुकसान केल्याप्रकरणी 7 ते 8 महिला आणि पुरुष यांच्याविरूद्ध एम.आय.डी.सी. सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • हिंदू जनगर्जना मोर्चाची रॅली आणि सभा संपल्यावर परत जाताना जमावातील काही लोकांनी निराला बाजार भागातील ॲक्सिस बँकेची काच फोडल्या, स्टेप ऑफ डान्स अकॅडमी औरंगाबाद नावाचे बॅनर व निराला बाजार भागातील इतर बॅनर फाडून दगडफेक करून सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्गेश सचिन चव्हाण (रा.कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर), विकी गोरखनाथ हेगडे (वय 30  वर्षे, रा. मोरे चौक बजाज नगर छत्रपती संभाजीनगर),  सुनील सुभाष बोराडे (रा.आखणी ता. मंठा जि. जालना ह. मु. सिडको,छत्रपती संभाजीनगर),  विशाल कृष्णा लांडे (रा. माऊली मांजरी ता.गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर), सिद्धार्थ किशोर काळे (रा.समता नगर,ता.गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर)  यांच्यासह इतर 10 ते 15  व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जालना रोडवरील चुन्नीलाल पेट्रोल पंपाजवळ महानगरपालिकेच्या सार्वजनिक स्मार्ट सिटी बस (क्र. MH 20 EL 3866)  ही प्रवासी घेऊन सिडको बस स्टँड ते मध्यवर्ती बस स्थानक येथे जात होती. दरम्यान यावेळी नामांतराच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चातील जमावातील 15 ते 20 लोकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत बसवर दगडफेक करून बसचे समोरील काच फोडली. तसेच खाजगी रिक्षा (क्र. MH 20 DC 4474 ) च्या टपावरील कपडा फाडून नुकसान केले. या प्रकरणी विशाल कृष्णा लांडे (वय 22 वर्षे रा. माऊली मांजरी ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर) , सिद्धार्थ किशोर काळे (वय 23 वर्षे, धंदा मजुरी रा. समतानगर गंगापुर ता. गंगापुर जि.  छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह  15 ते 20 लोकांवर वेदांतनगर  पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणांची हुल्लडबाजी; रस्त्यावरील होर्डिंग फाडले, बसची काचही फोडली