मुंबई :  भाजपच्या  12 निलंबित आमदारांचा फैसला सोमवारी होणार आहे. 11 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून, विधानभवनात निलंबनाबाबत पुनर्विचार होणार आहे. त्यामुळे 12 आमदारांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष लागलंय. 


येत्या सोमवारी विधान भवनात निलंबनाबाबत पुनर्विचार होणार आहे. भाजप आमदारांनी निलंबन मागे घेण्याबाबत अर्ज केल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षाकडून दखल घेण्यात आली आहे.  भाजपच्या 12 आमदारांना पावसाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते. आशिष शेलार, अभिमन्यू पवार,  अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं होतं.  या सर्व सदस्यांचे निलंबन एक वर्षांसाठी करण्यात आलं असून त्यांना मुंबई आणि नागपूर विधीमंडळाच्या आवारात एक वर्षे येण्यासाठी बंदी घातली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या कारवाईनंतर भाजपने बहिष्कार टाकला. 


काय आहे प्रकरण?


ओबीसी राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून इम्पेरिकल डेटा मिळावा यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला. मात्र अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. या निलंबनाच्या कारवाईविरोधात या 12 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या संदर्भातील सुनावणीदरम्यान निलंबनाला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिलाय. तसंच राज्य सरकारला नोटीस नोटीस देण्यात आली असून तूर्तास कुठलाही आदेश देण्यात आलेला नाही.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या :