नागपूर :  नागपूर महानगरपालिकेत घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीच्या आधारे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक संदीप सहारे यांनी हा घोटाळा उघडकीस आणलाय. कूलर व इतर स्टेशनरी साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप सहारे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा नागपुरात चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून सुरु असतानाच आणखी एक घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे.


कुलर व इतर स्टेशनरी साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप सहारे यांनी केला आहे.  सहारे यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे महापालिकेत 8 हजार रुपयांचा कुलर हा 59 हजार रुपयांमध्ये खरेदी केल्याचे समोर आले आहे. तर 8 हजार 496 रुपयांचा कुलर तब्बल 79 हजारांना खरेदी केल्याचं दाखवल्याचं आरोप ही सहारे यांनी केला आहे.  पेन, पेन स्टॅन्ड, गोंद, स्टेपल मशीन आणि त्याचे पिन, कॅल्क्युलेटर यासह इतर स्टेशनरीच्या खरेदीत ही महापालिकेच्या तिजोरीला मोठा चुना लावण्यात आल्याचा आरोप सहारे यांनी माहितीच्या अधिकाराच्या आधारे केला आहे.


गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा नागपुरात चर्चेचा विषय ठरला आहे.  घोटाळ्याची चौकशी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु असताना आता कुलर, पेन आणि इतर अनेक साहित्य खेरदीत ही घोटाळा झाल्याचे समोर आल्याने महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे समोर आले आहे. या सर्व वस्तूंची खरेदी स्थायी समितीमध्ये चर्चा होऊन केली जाते.  स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्य असून ते ही याकडे लक्ष का देत नाही असा सवाल ही सहारे यांनी उपस्थित केला आहे.  दरम्यान भ्रष्टाचाराच्या या आरोपाबद्दल महापालिका प्रशासन किंवा स्थायी समितीकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.


साहित्य                                    मनपाकडून खरेदीचा दर                बाजारातील दर


कुलर 40 लिटर                               59 हजार रुपये                      8 हजार 24 रुपये


कुलर 120 लिटर                             79 हजार रुपये                      8 हजार 496 


यू पिन प्लॅस्टीक कोटेड                      198 रुपये                            22 रुपये


प्लॅस्टीक फोल्ड बॅग                          181 रुपये                                 10 रुपये


एक्झिक्युटीव्ह पेन स्टॅण्ड एकरॉर्लिक    2995 रुपये                         90 ते 115 रुपये