Bhiwandi : भिवंडी (Bhiwandi) शहरातील चव्हाण कॉलनी परिसरात एका मंगल कार्यालयाची धोकादायक संरक्षक भिंत शेजाऱ्याच्या घरावर कोसळल्याने 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत रस्त्यावर खेळत असलेल्या तीन चिमुरड्या मुलांसह दोन वृद्ध, एक तरुणी असे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जेसीबीच्या साहाय्याने पाडकाम सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.


 तीन चिमुरड्या मुलांसह दोन वृद्ध, एक तरुणी असे सहा जण गंभीर जखमी
अलीशा (वय 3), नाझिया शेख (वय 17) , निजामुद्दीन अन्सारी (वय 60) वर्ष, फैजान (वय 8), जैनाब अजहर खान (वय 4) आणि एक सत्तर वर्षाची वृद्ध महिला असे या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सहा जणांची नावे असून यांना सुरुवातीला शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र गंभीर दुखापत असल्याने त्यांना ठाणे कळवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सध्या या सहाही जणांवर भिवंडीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अशी घडली घटना 
शहरातील चव्हाण कॉलनी परिसरात गरीब नवाज हॉल हे खुल्या मैदानातील मंगल कार्यालय होते.या मंगल कार्यालयाची संरक्षक भिंत धोकादायक झाल्याने मनपा प्रशासनाने खासगी कंत्राटदाराकडून धोकादायक भिंत पाडण्याचे काम मंगळवारी सायंकाळी सुरु केले होते. यावेळी भिंत पलीकडे असलेल्या रहिवासी गल्लीतील रस्त्यावर कोसळली. या रस्त्यावर अलिशा, फैजान आणि जैनाब ही लहान मुले खेळत होती, तर तिघेजण या रस्त्यावरून जात असताना भिंत अंगावर कोसळल्याने हे सहाही जण गंभीर जखमी झाले आहेत.


मनपा प्रशासनाच्या बेकायदेशीर कारभाराचा निषेध
या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी जेसीबीची तोडफोड केली व मनपा प्रशासनाच्या बेकायदेशीर कारभाराचा निषेध केला असून मनपा प्रशासनाने हि कारवाई करतांना परिसरातील नागरिकांना कोणतीही सूचना दिली असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. तर या जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मनपा प्रशासनाने उचलून या जखमींना आर्थिक साहाय्य करून बेजबाबदारपणे तोडक कारवाई करणाऱ्या मनपा अधिकारी कर्मचारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची करावी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक अरुण राऊत यांनी केली आहे. 


कोणतीही सूचना अथवा नोटीस नाही
दुर्घटनेतील धोकादायक भिंत तोडण्याची कोणतीही सूचना अथवा नोटीस मनपा प्रशासनाने कंत्राटदारास दिली नाही, त्यामुळे हि भिंत तोडण्यासाठी कोण गेलं होतं? यासंदर्भात चौकशी करावी लागेल अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ त्यांनी दिली आहे. या घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेमुळे परीसरात तणावच वातावरण पाहायला मिळाल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Todays Headline 28th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या