Maharashtra Beed News : मागच्या काही दिवसांपासून मशिदींवर लावलेल्या भोंग्यांवरून राज्यभर राजकारण होताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मशिदीवरच्या भोंग्यांवरून अजान चालू असतानाच हनुमान चालीसासुद्धा पठण करण्यात आलं आणि यामुळे काही अंशी सामाजिक सलोखा बिघडेल अशी परिस्थिती निर्माण झाली.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई जवळच्या पाटोदा गावात मात्र गावातील हरिनाम सप्ताहामध्ये रोजा धरणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पंक्तीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एकाच मांडवाखाली हिंदूंसाठी प्रसाद तर मुस्लिम बांधवांसाठी रोजा सोडण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक सलोखा राखत हिंदू-मुस्लीम बांधव या गावातील सणवार अगदी आनंदात साजरे करतात.
कोणताही गाजावाजा न करता अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये समाप्ती दिवशी पवित्र रमजानच्या महिन्यात रोजा असणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पंगतीचे आयोजन करून राजकारण्यांच्या धार्मिक विद्वेषाला आम्ही गावकरी कधीच बळी पडणार नाहीत असाच, सर्व गावकरी बंधुत्वाची परंपरा कायम ठेवणार, असा संदेश या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं पाटोदा गावकऱ्यांनी दिला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा गाव तसे विधायक कामांत नेहमी अग्रेसर असते. विविध विधायक चळवळीत नेहमीच पुढे असण्याची परंपरा लाभली आहे. गावाचा अखंड हरिनाम सप्ताह ची परंपरा गेल्या 26 वर्षांपासून कायम आहे. या सप्ताहात सर्व जाती धर्मांचे गावकरी हिरिरीने भाग घेतात. राम नवमी ते हनुमान जयंती या कालावधीत सप्ताह उत्साहात संपन्न होत असतो. या सप्ताह त मुस्लिम बांधवांतर्फे नाष्टाची पंगतही असते.
राज्यांमध्ये मशिदींवर लावलेल्या भोंग्यावरून मोठं राजकारण रंगतना पाहायला मिळत आहे. यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती संदर्भात सर्वसामान्य लोकात मात्र चिंतेचे वातावरण आहे. पाटोदा येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये रमझानच्या रोजेदार यांच्यासाठी पंगतीचे आयोजन करून सणसणीत चपराक देऊन सामाजिक ऐक्याचा मोठा संदेश पाटोदा गावानं आणि गावकऱ्यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :