लातूर: ट्रक चालकाने आर्थिक तंगीमुळे त्रस्त होऊन 36 लाखांच्या सुपारीच्या चोरीचा बनाव रचला. कर्नाटकातील सुपारी दिल्लीत पोहचती करण्याऐवजी ट्रक चोरीला गेल्याचा त्याने बनाव रचला आणि अवघ्या तीन दिवसात पोलिसांच्या हाती लागला . पोलिसांनी या ट्रॅक चालकाला त्याच्या साथिदारांसह अटक केली आहे.


नांदेड जिल्ह्यातील बारड येथील व्यंकटी बालाजी गायकवाड हा व्यवसायाने ट्रक चालक .मागील अनेक दिवसांपासून तो आर्थिक अडचणीत होता . यातून काहीतरी मार्ग काढावा यासाठी तो धडपड करत होता. यातच तो ट्रक घेऊन कर्नाटकातील शिमोगा येथे गेला होता. न्यू डायमंड ट्रान्सपोर्ट येथून 350 पोते सुपारी त्याच्या गाडीत भरण्यात आली. हा सगळा माल दिल्लीत जाणारा होता. मात्र व्यंकटीच्या मनात वेगळीच योजना तयार होती .


आपल्या वेगवेगळ्या गावात असलेल्या तीन मित्रांना त्याने कटात सामील केले. तो लातूर शहरातील गरुड चौकात आला. ट्रक पार्क करून तो बाहेर निघून गेला. या कालावधीत व्यंकटीच्या मित्राने ट्रक तेथून चोरला. 


व्यंकटीने विवेकानंद पोलीस ठाण्यात जात ट्रक चोरीला गेल्याची तक्रार दिली. पोलिसांची तपासाची चक्रे सुरू झाली . गाडीच्या पाठलाग सुरू करण्यात आला. यासाठी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या दोन पथकाने ट्रकचा माग काढण्यासाठी यंत्रणा कामाला लावली.


पोलिसांच्या नजरेतून व्यंकटीचे एकूण वर्तवणूक सुटली नाही . पोलिसांचा संशय बळावला. पोलिसानी व्यंकटीस विश्वासात घेतले  आणि त्याची विचारपूस केली. त्याने रचलेला बनाव कबूल केला. 


दिल्लीचा माल मुंबईत विकला
या ट्रकमधील 350 पोती सुपारी दिल्लीत जाणार होती. मात्र ती विकली गेली ठाणे जिल्ह्यातील पूर्णा येथे. विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पथकाने यातील व्यंकटीसह इतर तीन लोकांना अटक केली आहे. यातील चारही आरोपींना वेगवेगळ्या शहरातून अटक करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यातील चोरी गेलेली मालपोते सुपारी ही विक्री करण्यासाठी घेऊन जाणारे आरोपी व्यंकटी बालाजी गायकवाड रा.बारड ता.मुदखेड जि.नांदेड, अनिरुध्द ऊर्फ बाळू भारत मिसाळ रा. औरंगाबाद, फारुख अहेमद खॉन रा.गोरेवाड रोड, नागपूर आणि हुसेन नासर शेख रा. मालटेकडी रोड, नांदेड हे आहेत. विवेकानंद पोलीस यातील पुढील तपास करत आहेत.


वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पोलिसांचे कौतुक
गुन्ह्याची उकल करताना विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पोलिसांची बरीच धावपळ झाली. वेगवेगळ्या शहरात आरोपी होते. मात्र पीआय सुधाकर बावकर यांचे प्रयास कामाला आले. काही दिवसात यातील सर्व आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यांचे काम उत्तमच झाले आहे अशी कौतुक लातूर जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी केले आहे.