औरंगाबाद : औरंगाबादेत निजामाचा वंशज असल्याचं सांगत बटाटा, कांद्याचा वापर करुन बनवलेल्या शिक्क्यांंच्या आधारे शहरालगत हिमायत बागेतील 400 एकर जमिनीवर दावा सांगत फळबाग संशोधन विद्यापीठ केंद्राची एक एकर जमीन 25 लाखात विकल्याचं समोर आलं आहे . पोलिसांनी निजामाचा वंशज आहे असं सांगणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. अली खान ऊर्फ दिलशाद जहां असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
अली खान ऊर्फ दिलशाद जहां हे स्वतःला निजामाचे वंशज असल्याचं सांगतात. दिलशाद म्हणतात की आमच्या हिश्श्यात हिमायतबाग येथे चारशे एकर जमीन येते. निजामांनी आपल्याला या जमिनीच्या विक्रीसंदर्भातली पावर ऑफ अटर्नी दिली आहे असं सांगत त्यातीलच एक एकर जमीन त्याने पेशाने शिक्षक मोहंमद नदीम सलीम पाशा यांना 25 लाखात बॉंडवर विकली.
मोहम्मद पाशा यांनी निजाम असल्याचा दावा करणाऱ्या अली खान ऊर्फ दिलशाद जहां यांना जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी वारंवार विनवणी केली. त्यातच सरकारच्याही लक्षात आलं की फळबाग संशोधन विद्यापीठाच्या नियोजित जागेवर अतिक्रमण झालं आहे. जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी हे अतिक्रमण काढून टाकलं. त्याच वेळी मोहम्मद पाशा यांच्या आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आणि निजामाचा वंशज सांगणाऱ्याला बेड्या ठोकल्या गेल्या.
पोलिसात तक्रार केल्यानंतर या निजामाच्या वंशजांनी तक्रारकर्त्याला कॉन्ट्रॅक्ट किलर कडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या वंशजाने हिमायतबागेतील आणखी 17 एकर जमीन विक्री केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून हैदराबाद येथून अनेक निजामांचे वंशज येतात आणि औरंगाबाद मधल्या शहरात निजामांच्या जमिनीवरती दावा सांगतात. औरंगाबाद शहरात खरोखरच निजामांची जमीन आहे का? आहे तर ती किती आहे ?आणि त्याची विक्रीची परवानगी कोणाला आहे का? याबाबत अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
निजामाचा बँकेत सांगून जमीन विकणाऱ्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे कोणी आपल्याला निजामाचा वंशज सांगून जमीन विकत असेल तर सावधान आपलीही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.