नांदेड : शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने, केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आतपर्यंत दोन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यात आलीय. परंतु नांदेड जिल्ह्यातील तीन तालुक्यात बनावट लाभार्थी आयडीच्या माध्यमातून 30 हजार 283 नावे, पीएम किसान सन्मान योजनेत बोगस लाभार्थी दाखवून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाला आहे. 


नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत बोगस लाभार्थी शेतकरी दाखवून भ्रष्टाचार करण्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणात  किनवट तहसील कार्यालयाचा युजर आयडी हॅक करून हॅकरने मुदखेड, भोकर, किनवट, लोहा या तालुक्यात बोगस लाभधारक प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सामील करून शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न  सुरु केला आहे. 


यात नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात 5 हजार 245 , मुदखेडमधी 19 हजार 553 तर लोहा येथील 5 हजार 485 असे एकूण 30 हजार 283 बोगस लाभार्थ्यांची नोंद करण्यात आलीय. किनवटमध्ये यापूर्वीही राज्यभरात गाजलेला एमपीएससी भरती सारखा घोटाळा घडला होता आणि आता पीएम किसान सन्मान योजनेत बोगस लाभार्थी नोंदणीचा प्रकार समोर आलाय.


किनवट तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात आयटी अॅक्ट नुसार किनवट पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची पात्रता यादी, त्यांची आधार कार्ड व इतर माहिती ही कृषी विभागाकडून तहसील कार्यालयाला दिली जाते. तहसील कार्यालय युजर आयडीचा उपयोग करून नोंदणी करते. परंतु तहसील कार्यालयातून पासवर्ड आणि युजर आयडी चोरीला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतु एका शासकीय कार्यालयाचा युजर आयडी हॅक करून पीएम किसान सन्मान योजनेत तब्बल 30 हजार बोगस लाभार्थी नोंद करण्यात येते व प्रशासनास काहीच पत्ता लागत नाही. त्यामुळे  प्रशासकीय कार्यालयातील भोंगळ कार्यभार चव्हाट्यावर आला आहे. तर शासकीय कार्यालयातील गोपनीय माहिती अथवा पाडवर्ड इतर व्यक्तीस देणारा कोण हे शोधण्याचे आव्हान प्रशासन व पोलिसांसमोर आहे.