Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्र राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session) आजचा पाचवा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केल्याचे पडसाद आज विधानसभेच्या कामकाजावर पडण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून आजच्या कामकाजावर बहिष्कार घातला जाण्याची शक्यता आहे. विधानसभेतील कामकाजावर बहिष्कार घालत विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून दिवसभर आंदोलन होण्याची शक्यता आहे.
विधीमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस चांगलाच वादळी ठरला. फोन टॅपिंगच्या प्रकरणात राज्य सरकारने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या चौकशी प्रकरणी क्लोजर रिपोर्ट हायकोर्टात दाखल केल्याचा मुद्या विरोधकांनी उपस्थित केला होता. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी नियमांचा हवाला देत चर्चा नाकारली. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
विरोधकांकडून एनआयटी भूखंड प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. तर, दुसरीकडे सत्ताधारी आमदारांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी चौकशीची मागणी लावून धरली होती. दोन्ही बाजूंकडून गदारोळ सुरू असल्याने विधानसभेचे कामकाज काही वेळेस स्थगित करण्यात आले होते. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर विरोधकांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची मागणी केली होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ही परवानगी नाकारल्याने विरोधक आक्रमक झाले. या गदारोळात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांसाठी असंसदीय शब्द उचारला. त्यानंतर त्यांच्यावर अधिवेशन संपेपर्यंत सभागृहातून निलंबित करण्याचा ठराव मंजूर झाला. जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला असल्याचे दिसून आले. पायऱ्यांवर सुरू असलेल्या विरोधकांच्या आंदोलनात जयंत पाटीलही सहभागी होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 'आठ दिवस असेच जातील जयंत पाटील पुन्हा येतील...' 'हम मे है दम,करेक्ट कार्यक्रम करेंगे हम' अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या.
आजच्या विधीमंडळ अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी जयंत पाटील यांचे निलंबन, कर्नाटक सरकारने सीमा प्रश्नाबाबत केलेला ठराव आणि सभागृहात विरोधकांना बोलू न देणे या मुद्द्यांवर विरोधक आज आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. गुरुवारी, जयंत पाटील यांच्यावर कारवाई केल्यानंतर दुपारनंतर पायऱ्यांवर बसून विरोधकांनी निषेध केला. त्यानंतर आजही पायऱ्यांवर बसून विरोधक निषेध करणार असल्याची शक्यता आहे. आज काळी 10 वाजता विरोधकांची रणनीती ठरवण्यासाठी विधान भवनात बैठक आयोजन करण्यात येणार आहे.