Maharashtra Assembly Winter Session : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री अधिवेळनाला हजेरी लावू शकले नाहीत. त्यामुळे सुरूवातीपासूनच विरोधी पक्षातील आमदारांनी सत्ताधाऱ्यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. आज शेवटच्या दिवशीही विरोधकांनी ही संधी सोडली नाही. "उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाचं कामकाज अत्यंत चांगलं झालं, या काळात अनेक विषयांना न्याय मिळाला. म्हणून अधिवेशनाच्या काळात अजित पवारांकडे नेतृत्व द्यावं आणि इतर वेळी उद्धव ठाकरेंनी नेतृत्व करावं अशी सूचना मुनगंटीवारांनी राज्याचे मंत्री आदित्य ठाकरेंना आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली. त्यामुळे विविध प्रश्नांसह या सूचनेमुळे अधिवेशनाचा शेवटचा दिवसही एकमेकांना टोलेबाजी करण्यामुळे चांगलाच वादळी ठरला. 


हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्याचा सरकारचा प्रस्ताव बारगळल्यात जमा आहे. राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक घेतल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भीती असल्याने आघाडी सरकारने निवडणूक टाळल्याची चर्चा आहे. आवाजी मतदानाने अध्यक्ष निवड घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी काल कळवल्यानंतरही निवडणूक घेण्याची तयारी सत्ताधारी आघाडीनं केली होती. परंतु अखेर आघाडी सरकारने आपला निर्णय मागे घेतला. 


वादग्रस्त वक्तव्यांना गाजलं आधिवेशन
यंदाच्या अधिवेशनात काही सदस्यांच्या आक्षेपार्ह आणि बेशिस्त वर्तनाचा मुद्दा गाजला आणि त्यातून वादही झाले. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी स्वयंशिस्त आणि शिष्टाचार पाळावा यासाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत झाला आणि त्याबाबतचं निवेदन विधानसभेत आज करण्यात आलं. आपण कुत्रा, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचं प्रतिनिधीत्व करत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे यांचं नाव न घेता टोला लगावला. वाढत्या बेशिस्त वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करत शिस्त पाळण्यासाठी आवाहन त्यांनी केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याशी सहमती दर्शवली. पण राजकीय बदल्यासाठी आमदारांचं निलंबन वर्षभरासाठी केलं जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे पहिला दिवस वादळी ठरला.  


सुधीर मुनगंटीवारांच्या कोपरखळ्या


अजित पवार यांच्या कानउघडणीसह भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या कोपरखळ्यांनीही पाचवा दिवस चांगलाच वादळी ठरला. "या वेळचं अधिवेशन पाचच दिवस झालं. पण या काळात अजितदादांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम काम झालं. मी आदित्य ठाकरेंना सूचना करतो की अधिवेशन काळात सरकारचं नेतृत्व अजितदादांकडे द्या, इतर वेळी नेतृत्व बाबांकडे (उद्धव ठाकरे) द्या. कारण हे कामकाज तरी होऊ शकलं. अनेक विषय मार्गी लागले. अनेक विषयांना न्याय मिळाला." अशा कानपिचक्या मुनगंटीवार यांनी लगावल्या. 


नवी मुंबईतील डान्सबारचं स्टिंग ऑपरेशनचे अधिवेशनात पडसाद
नवी मुंबईत डान्स बारमध्ये  सुरु असलेला वेश्याव्यवसाय  एबीपी माझानं उघड केला आणि काही तासांमध्येच सरकारी हालचाली वाढल्या. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि सतेज पाटील दोघांनीही तातडीनं कारवाईचं आश्वासन दिलं. इतकंच नाही, तर थेट विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशेनात त्याचे पडसाद उमटले.


नवी मुंबईमधील डान्सबारच्या केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा मुद्दा आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उपस्थित केला. एबीपी माझानं काल यासंदर्भात स्टिंग ऑपरेशन केलं होतं. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. अधिवेशन सुरू असल्याचीही भीतीही अधिकाऱ्यांना नाही का? असा प्रश्न विचारत त्यांनी चिंता व्यक्त केली. माझाच्या बातमीनंतर नवी मुंबई पोलिसांची बैठक बोलावण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सभागृहात यासंदर्भात माहिती दिली.


शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण
राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. वर्षा गायकवाड काल (सोमवारी) अधिवेशनात उपस्थित होत्या. अनेक मंत्री, आमदार वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. 


आदित्यजी, अधिवेशनकाळात नेतृत्व दादांना द्या आणि इतर काळात बाबांना द्या : Sudhir Mungantiwar : पाहा व्हिडिओ


 


महत्वाच्या बातम्या