Maharashtra Assembly Winter Session 2023: राज्याचं हिवाळी अधिवेशन 10 दिवसांत गुंडाळण्याची चिन्हं, तात्पुरतं वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं (Winter Session Maharashtra) तात्पुरतं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 7 डिसेंबर ते 20 डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र यंदाचं हिवाळी अधिवेशन अवघ्या 10 दिवसांत गुंडाळलं जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra Assembly Winter Session 2023: नागपूर : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं (Winter Session Maharashtra) तात्पुरतं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 7 डिसेंबर ते 20 डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र यंदाचं हिवाळी अधिवेशन अवघ्या 10 दिवसांत गुंडाळलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान दरवर्षी हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपते मात्र या वर्षी अधिवेशन 20 डिसेंबर म्हणजे बुधवारीच गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला दोन दिवसांची कात्री लावली जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान दहा दिवसाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर झाली आहे. म्हणजे 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचे कामकाज 20 डिसेंबरपर्यंतच नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 20 तारखेलाच अधिवेशन गुंडाळलं जाणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नाना पटोले आक्रमक
दरम्यान, हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते नाना पटोले आक्रमक झाले आहेत. "देवेंद्र फडणवीस राज्याचे सरकार चालवत आहेत. विदर्भात हे अधिवेशन दोन महिने चालले पाहिजे असे म्हणणारे आज सत्तेत आहेत. फडणवीस आज सत्तेत आहेत. ते विदर्भाचे आहेत. त्यांनी अधिवेशन नागपूर करारप्रमाणे चालवले पाहिजे. हिवाळी अधिवेशन दोन महिने घेतले पाहिजे", असं नाना पटोले म्हणाले.
हिवाळी अधिवेशनापर्यंत काय काय खेळ होतात ते पाहा. सर्वोच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले आहे. ते यांनी समजून घ्यावे. त्यामुळे नागपूरच्या अधिवेशनापर्यत काय काय होते हे पाहा, असं नाना पटोलेंनी सांगितलं.
हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार?
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु झाली आहे. नाशिक-पुण्यातील ड्रग्ज प्रकरण, राज्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, नागपूरमध्ये अतिवृष्टीने झालेलं नुकसान याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुराच्या तडाख्याने नागरिकांचे मोठे नुकसान झालेल्या,पायाभूत सोयी सुविधांचे नुकसान झालेल्या नागपूर शहर आणि जिल्ह्याला हिवाळी अधिवेशनाच्या काळात विशेष पॅकेज मिळेल, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं होतं.
मागील हिवाळी अधिवेशनात काय झालं होतं?
गेल्यावर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन भरलं होतं. त्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. विधानसभा अध्यक्षांसाठी वापरलेल्या निर्लज्ज शब्दावरुन ही कारवाई करण्यात आली होती.इतकंच नाही तर हिवाळी अधिवेशन काळापर्यंत विधीमंडळात जयंत पाटलांना प्रवेशबंदी घालण्यात आली होती. त्यामुळे ते अधिवेशन जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरुन गाजली होतं.