Maharashtra Assembly Session : मणिपूरमध्ये (Manipur) महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकणाचे संसदेच्या आणि राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये (Maharashtra Assembly Session) घमासान होत आहे. विधानपरिषदेमध्ये (Vidhanparishad) मणिपूरच्या मुद्यावरुन विरोधकांनी एकच गोंधळ केला. दरम्यान विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी या चर्चेसाठी परवानगी दिली नसल्याने विरोधकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावर बोलताना निलम गोऱ्हे यांनी म्हटलं की, "मी स्वतः  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन दिले आहे. ही घटना गंभीर असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरुन राजकारण करु नये." 


विधानपरिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तर मणिपूर देशामध्ये आहे की नाही असा सवाल करत विरोधकांनी आक्रमक भूमिका विधानपरिषदेमध्ये घेतली. दरम्यान विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी यावर कोणतीही राजकीय भूमिका मांडण्यास नकार दिला. त्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. 


विधानसभेत विरोधकांकडून सभात्याग


विधानसभेत मणिपूरचा मुद्दा महिला आमदारांना उपस्थित करायचा होता. म्हणून काँग्रेसच्या महिला आमदारांनी त्यावर बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे  परवानगी मागितली. पण त्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी त्यासाठी परवानगी नाकारली. त्यामुळे विधानसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभात्याग केला. यावर बोलताना विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं की, 'कोणतीही पूर्व सूचना दिली नसल्यामुळे यावर बोलण्यासाठी परवानगी देता येणार नाही.  तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. पण तुम्ही नियम पाळला नसल्यामुळे तुम्हाला चर्चा करण्याची परवानगी देणार नाही.' यामुळे आक्रमक होऊन विरोधकांनी सभात्याग केला. 


काँग्रेसच्या महिला आमदार आक्रमक


तर मणिपूरच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या महिला आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं की, 'ही भाजप आणि काँग्रेसच्या लोकांसाठी नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी ही अत्यंत लज्जास्पद आहे. आम्हाला साधं या विषयावर बोलण्याची परवानगी अध्यक्षांनी दिली नाही ही अत्यंत खेदजनक बाब आहे.' तर काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांनी देखील यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षांना हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी काय अडचण होती असा सवाल केला आहे. या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या मुद्द्यावरुन विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये एकच गोंधळ झाला होता. 


हे ही वाचा : 


शेतकरी आत्महत्या संदर्भातील 'एबीपी माझा'च्या बातमीची अधिवेशनात दखल, पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैसे द्या; खडसेंची मागणी