Marathwada Farmer Suicide : शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) रोखण्यासाठी मराठवाडा (Marathwada) विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी आठही जिल्ह्यात एक सर्व्हे केला होता. ज्यात मराठवाड्यातील 1 लाख 5 हजार 754 शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर खरीप आणि रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना 10 हजार रुपये देण्याचं निकष यावेळी काढण्यात आला होता. दरम्यान हा अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती लागला असून, याबाबत 'माझा'ने वृत्त दाखवताच याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना पेरणीसाठी 10 हजार रुपये देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान यावेळी सभागृहात बोलताना खडसे म्हणाले की, "मराठवाड्यातील 1 लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून 500 रुपये महिना दिला जात आहे. दरम्यान शेतकरी आत्महत्याबाबत माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अहवालाबाबत कृषीमंत्री यांनी छाननी करावी. तसेच याबाबत करवाई करावी. केंद्रेकर यांच म्हणणं आहे की, पेरणीच्या वेळीस शेतकऱ्याला रोख रक्कम देण्यात यावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान दिलं पाहिजे असं त्यांच्या अहवालात म्हटले आहे." त्यामुळे निर्णय घेण्याची मागणी खडसे यांनी केली आहे.
खळबळजनक अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती
तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केलेला अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. ज्यात एकूण 10 लाख शेतकरी कुटुंबांपैकी 1 लाख 5 हजार 754 शेतकरी कुटुंब अति संवेदनशील यादीत म्हणजेच आत्महत्या करण्याच्या विचारत असल्याचे समोर आले आहेत. तर 2 लाख 98 हजार 51 शेतकरी कुटुंब संवेदनशील आढळून आली आहे. तर मराठवाडा विभागात सन 2012 ते 2022 या कालावधीत एकूण 8 हजार 719 शेतकरी आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी 923 नापिकीमुळे, 1 हजार 494 कर्जबाजारीपणामुळे, 4 हजार 371 नापिकी व कर्जबाजारीपणा या दोन्ही एकत्रित कारणामुळे. तर 2 कर्ज परतफेडीच्या तगाद्यामुळे आणि 1 हजार 929 इतर कारणांमुळे शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे.
केंद्रेकरांचा अहवाल अत्यंत गंभीर : रोहित पवार
दरम्यान यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिकिया दिली आहे. “सुनील केंद्रेकरांचा अहवाल अत्यंत गंभीर आहे. सरकारने त्यावर चर्चा केली पाहिजे. उपाययोजना केल्या पाहिजे. बुलेट ट्रेनला जर आपण खर्च करु शकतो, मग शेतकऱ्यांसाठी का नाही असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: