मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रखडलेलं पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपणार हे काही वेगळं सांगायला नको. पण यावेळी मुद्दे काय असतील? कोण कोणाच्या निशाण्यावर असेल हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 


या वेळच्या अधिवेशनात एकनाथ शिंदे- फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असंच काहीसं वर्णन यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचं करावं लागेल. कारण शिवसेनेत बंडखोरी झाली आणि सत्तांतरही झालं. मागच्या अधिवेशनात सत्तेत असलेली महाविकास आघाडी आता विरोधी बाकावर दिसणार आहे. मंत्र्यांनी नुकताच शपथ घेतली आणि नुकतेच खातं वाटप झालेलं आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार आहे. पण सत्ताधारीसुद्धा चांगलेच तेल लावलेले पैलवान आहेत. त्यामुळे यंदाचं पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजण्याची शक्यता आहे. 


राज्य चालवणारे तेच मात्र राजा नवीन आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड केल्यानंतरचं एकनाथ शिंदेचं हे पहिलंच पावसाळी अधिवेशन असणार आहे. एकनाथ शिंदे यांनी विकासाचा मुद्दा ठेवत बंड पुकारलं होतं. पण आता शिंदे विकासाची कोणती दोरी पकडत राज्याला पुढे नेणार? विकासाचे मुद्दे पुढे घेऊन जात असताना राज्यावर असणाऱ्या संकंटाना विसरून चालणार नाही. 


एक नजर टाकूया अधिवेशनात गाजणाऱ्या मुद्द्यांवर,
1) मुसळधार पावसानं केलेलं शेतीचं नुकसान 
2) पूरपरिस्थिती 
3) रखडलेले प्रकल्प 
4) वादग्रस्त आमदार आणि मंत्री 
5) राज्यावरचं कर्ज 
6) मागच्या सरकारच्या कामांची चौकशी
7) राज्यपाल नियुक्त 12 नावांवरून गदारोळ. 


येत्या 17 ॲागस्टपासून ते 25 ॲागस्टपर्यंत अधिवेशनाचा कालवाधी असणार आहे. या कालावधीत शुक्रवारी, 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुट्टी आहे. दिनांक 20 आणि 21 ऑगस्ट या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या आहेत. 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. सुरुवातीला शोक प्रस्ताव, नवीन मंत्र्याची ओळख आणि शेवटी अंतिम आठवडा प्रस्ताव आणि त्यामध्ये रंगेल ते सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये घमासान होण्याची शक्यता आहे.


एकनाथ शिंदेच्या बंडानंतरचं पहिलं पावसाळी अधिवेशन असल्यानं शिंदेसमोर प्रश्न अनेक पण वेळ कमी असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांवर सत्ताधाऱ्यांची मदार असणार आहे तर अजित पवार, सुनिल प्रभू आणि नाना पटोलेंवर विरोधी पक्षाची मदार असणार आहे. सत्तेत असताना महाविकास आघाडीची एकजूट आता विरोधी पक्षात आल्यावरही कायम असेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. जे चित्र विधानसभेत पाहायला मिळाणार तशीच आक्रमकता विधानपरिषदेतही दिसणार यांत काही शंका नाही.


महत्त्वाच्या बातम्या: