Shambhuraj Desai : "खाते वाटपावर  (Allocation of Portfolios) आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. नाराज असल्याचा वावड्या जाणीवपूर्व उठवल्या जात आहेत," असं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी म्हटलं. तसंच चांगल्या वातावरणात अधिवेशन (Maharashtra Assembly Session) पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे  गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन खात्याचा कारभार होता. आता त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्काचे कॅबिनेट मंत्रिपद आलं आहे.


चांगल्या वातावरणात अधिवेशन पार पडेल
"उद्या अधिवेशन सुरु होणार आहे. चांगल्या वातवरणात अधिवेशन पार पडेल. आज संध्याकाळी पाच वाजता सर्व विरोधी पक्षनेत्यांना चहापानासाठी बोलावलं आहे. आज मंत्रिमंडळ बैठक होईल. यामध्ये पुरवणी मागण्यांबाबत देखील चर्चा होईल. 17 ते 25 पर्यंत अधिवेशन पार पडेल. राज्य मंत्रिमंडळ आगामी अधिवेशनाला अभ्यासपूर्ण सामारं जाईल," असं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं.


जाणीवपूर्वक नाराज असल्याच्या वावड्या
खाते वाटपात शिंदे गटातील मंत्र्यांना कमी महत्त्वाची खाती मिळाली असून ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यावर स्पष्टीकरण देताना शंभूराज देसाई म्हणाले की, आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. नाराज असल्याबाबत जाणीवपूर्वक वावड्या उठवल्या जात आहेत. आम्ही पहिल्याच दिवशी आमचे पूर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले होते. आम्ही तसा ठराव देखील केला होता. त्यामुळे कोणीतरी अशा वावड्या उठवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये.


प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य म्हणजे अॅक्शनला रिअॅक्शन
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाई म्हणाले की, प्रकाश सुर्वे याचं वक्तव्य म्हणजे अॅक्शनला रिअॅक्शन आहे. कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांवर कोणीतरी दादागिरी केली असेल त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी ते तसं बोलले असतील असं मला वाटतं. ते आक्रमकपणे बोलतील असं मला वाटत नाही."
"कोणी अरे केलं तर त्याला कारे करत ठोकून काढा, प्रकाश सुव्रे इथे बसला आहे... ठोकून काढा. हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा...दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करुन देतो मी. चिंता करु नका..," असं प्रकाश सुर्वे म्हणाले होते.


तर आमदार संजय बांगर यांनी अनावधनाने मारहाण केली असावी, असं शंभूराज देसाई म्हणाले. कामगारांना मिळत असलेलं जेवण पाहिलं. त्यांना निश्चित केलेला आहार नसल्याने चिडून बांगर यांनी हात उगारला असेल. पण हात उगारणं योग्य नाही, त्यांनी समजून सांगायला हवं होतं. 


'सत्ता डोक्यात जाणाऱ्यांपैकी आम्ही नाही'
सत्ता डोक्यात जाणाऱ्यांपैकी आम्ही 51 जण बिलकुल नाही. आम्ही सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधी आहोत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करतो. काही लोकप्रतिनिधींची काम करण्याची पद्धत शांत संयमी असते, काही लोकप्रतिनिधीं पहिल्यापासूनच काहीसे आक्रमक आहेत. आम्ही सगळे सकारात्मक दृष्टीने काम करणारे आहोत. आमच्या कोणाचाही डोक्यात हवा जाणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांची आम्ही शिवसैनिक आहोत. त्यांच्या शिकवणीनुसार आमचं कामकाज राहिल, असं शंभूराज देसाई म्हणाले.


विनायक मेटे यांचं अपघाती निधन, निष्कर्ष निघेपर्यंत बोलणं योग्य नाही : शंभूराज देसाई
विनायक मेटे यांचा दुर्दैवी अपघात झाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्या तपास करण्याचे आदेश दिले. वेगवेगळ्या टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे. चालक, अंगरक्षाकाकडून माहिती घेतली. ज्या वाहनाने धडक दिली त्याच्या चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. जोपर्यंत वेगवेगळ्या यंत्रणांचा चौकशीतून निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही. पण राज्य सरकार सविस्तर चौकशी करेल, असं शंभूराज देसाई म्हणाले.


आमच्या दुही, मतभेद निर्माण करण्याचा 'सामना'तून प्रयत्न
मागील दोन महिन्यांपासून 'सामना'तून काय वक्तव्य येत आहेत हे महाराष्ट्र पाहत आहे. आमच्यामध्ये दुही निर्माण करण्याचा, मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न सामनामधून केला जात आहे. पण अशी वस्तुस्थिती नाही. आमचा एकनाथ शिंदे यांच्यावर हजार टक्के विश्वास आहे. आमची एकी कोणी तोडू शकणार नाही, असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.


'वंदे मातरम् बाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री निर्णय घेतील'
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या एका निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. फोनवर 'हेलो' ऐवजी 'वंदे मातरम्' बोलावं लागेल असा निर्णय मुनगंटीवार यांनी जाहीर केला. यावर शंभूराज देसाई म्हणाले की, "देशप्रेम, राष्ट्रप्रेम हे डोळ्यासमोर ठेवून सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतील. दरम्यान 'हेलो' ऐवजी 'वंदे मातरम्' बोलण्याच्या निर्णयाला रझा अकादमीने विरोध केला. परंतु त्याच वेळी शिंदे गटाचीही काहीशी अडचण झाली आहे. कारण शिवसेने जय महाराष्ट्र बोलण्याची परंपरा आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील आमदारही जय महाराष्ट्र ऐवजी वंदे मातरम् बोलणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


Shambhuraj Desai : Prakash Surve याचं वक्तव्य म्हणाजे Action ला Reaction : शंभूराज देसाई